टेबल कॅलेंडरवर अवतरली मार्कंड्याची शिल्पकला

By admin | Published: February 28, 2016 01:22 AM2016-02-28T01:22:04+5:302016-02-28T01:22:04+5:30

मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिराच्या शिल्पकलेशी मिळतेजुळते असलेले गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील....

Markand sculpture on the table calendar | टेबल कॅलेंडरवर अवतरली मार्कंड्याची शिल्पकला

टेबल कॅलेंडरवर अवतरली मार्कंड्याची शिल्पकला

Next

दिगांबर जवादे गडचिरोली
मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिराच्या शिल्पकलेशी मिळतेजुळते असलेले गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील हेमाडपंथी मंदिर प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिले आहे. या मंदिराकडे पर्यटकांसह शासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. येथील मंदिरांचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर असतानाच गडचिरोलीतील वीणा संजय धात्रक या विद्यार्थिनीने टेबल कॅलेंडरच्या माध्यमातून मार्कंडेश्वर मंदिराला महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. डाक्युमेन्ट्री फिल्म तयार करून त्या माध्यमातून येथील शिल्पकला जगभर पसरविण्याचा मानस वीणाने व्यक्त केला आहे. वीणाने केलेल्या या उपक्रमामुळे मार्कंडादेव मंदिराला प्रसिद्धीसह गतवैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गडचिरोलीच्या तरूणीचा पुढाकार : डाक्युमेन्ट्री फिल्मही बनणार
गडचिरोली येथील संजय धात्रक यांच्या संपूर्ण कुटुंबाने कलेच्या क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांचीच लहान मुलगी वीणा संजय धात्रक ही मुंबई येथील जे. जे. इन्स्टिट्यूटमध्ये अप्लाईड आर्टचे शिक्षण घेत आहे. उत्कृष्ट कलेचा नमूना असलेले मार्कंडादेव देवस्थान केवळ प्रसिद्धीअभावी मागे पडले आहे. मार्र्कंडादेव येथील मंदिर अतिशय प्राचीन असून सदर मंदिर हेमाडपंथी आहे. येथील शिल्पकला खजुराहो मंदिराच्या तोडीची असली तरी खजुराहो मंदिराला जेवढी प्रसिद्धी प्राप्त झाली आहे, तेवढी प्रसिद्धी मार्कंडादेव मंदिराला प्राप्त झाली नाही. ही बाब वीणा व तीच्या कुटुंबीयांना सातत्याने बोचत होती. त्यांनी या मंदिराला जगभर पोहोचविण्याचा निश्चय केला आहे. त्याची प्राथमिक पायरी म्हणून १२ पानांचे टेबल कॅलेंडर तयार केले. टेबल कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर मंदिराच्या वेगवेगळ्या भागाचे छायाचित्र दर्शविण्यात आले आहे. पहिल्या पानावर या मंदिराची ऐतिहासिक माहिती देण्यात आली आहे. इतर पानांवर मंदिराच्या भिंतीवरील मूर्तींसोबत मॉडेल म्हणून वीणाची मामेबहीण सृष्टी देवानंद वऱ्हाडे नृत्य करतानाचे चित्र आहे. सृष्टी केवळ १४ वर्षांची असून ती सुद्धा नृत्याचे शिक्षण घेत आहे. या संपूर्ण कॅलेंडरचे डिझाईन व फोटो शूटिंग वीणाने केली आहे. मार्कंडादेव मंदिराला जगप्रसिद्ध करण्यासाठी २० मिनिटांची डाक्युमेन्ट्री फिल्म तयार करण्याचा निर्धार वीणाने व्यक्त केला आहे. डाक्युमेन्ट्री फिल्मचा काही भाग तिने शूटसुद्धा केला आहे. उर्वरित काम पुढील पाच ते सहा महिन्यांत पूर्ण करणार आहे. मंदिराचा वरचा भाग अतिशय सौंदर्यपूर्ण आहे. मात्र या भागाचे अजूनपर्यंत वरून चित्रीकरण करण्यात आले नाही. वरून चित्रीकरण करण्यासाठी ती गो. प्रो. कॅमेरा (छोटा कॅमेरा) किरायाणे आणणार आहे. सदर कॅमेरा खेळण्याच्या हेलिकॉप्टर बसवून मंदिराचे चित्रीकरण केले जाणार आहे. हे चित्रीकरण यू-ट्यूबवर टाकून त्याला जगप्रसिद्ध करण्याचा निर्धार वीणाने व्यक्त केला आहे. मार्कंडाच्या प्रसिद्धीसाठी मार्कंडा महोत्सवाचेही आयोजन केले जाणार आहे. गडचिरोलीची रहिवासी असलेल्या वीणाने मार्कंडा देवस्थानाला जगप्रसिद्धी मिळवून देण्याचा पहिल्यांदाच अनोखा प्रयत्न केला आहे.

Web Title: Markand sculpture on the table calendar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.