आलापल्ली व अहेरीतील बाजारपेठ ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:28+5:30
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गडचिरोली न.प.प्रशासनाने पुढाकार घेतला असून कार्यालयात अनावश्यक लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. न.प.च्या कोणत्याही सेवेसाठी किंवा तक्रारीसाठी ई-मेलवर पत्रव्यवहार करावा, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. याशिवाय विभाग प्रमुखांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचे सर्व उपाय आखणे आता सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माणसांची गर्दी आणि त्यातून होणारा विषाणूचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी बाजारपेठांवरही निर्बंध आणण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद करण्यात आले असून शहरी भागातही गर्दीचे मार्केट, मॉल बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहे.
गडचिरोली न.प.तर्फे खबरदारी
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गडचिरोली न.प.प्रशासनाने पुढाकार घेतला असून कार्यालयात अनावश्यक लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. न.प.च्या कोणत्याही सेवेसाठी किंवा तक्रारीसाठी ई-मेलवर पत्रव्यवहार करावा, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. याशिवाय विभाग प्रमुखांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
आलापल्ली- अहेरी तालुक्यातील सर्व ठिकाणचे आठवडी बाजारात ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. बुधवारी आलापल्ली व अहेरी शहरातील बाजारपेठ ओस पडली होती. २५ पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ नये, अत्यावश्यक वस्तू व सेवा सोडून इतर दुकाने बंद ठेवावी, असे आदेश तहसीलदार ओंकार ओतारी यांनी काढले आहे. सर्व हॉटेल व लॉज मालकांना माहिती पत्रक देण्यात आले असून बाहेर गावाहून येणाºया प्रवाशांची माहिती प्रशासनाला कळवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कापड दुकान, खर्रा, पानठेला आदी दुकाने तसेच कोचिंग क्लासेस, शाळा, अंगणवाडी, आश्रमशाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. परराज्यातून येणाºया एसटी बसेसची वाहतूक बंद करण्याच्या सूचना अहेरी आगाराला पत्रान्वये देण्यात आल्या.
चामोर्शी व राजारामचा आठवडी बाजार राहणार बंद - चामोर्शी शहरातील व अहेरी तालुक्याच्या राजाराम येथे गुरूवारी भरणारा आठवडी बाजार कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला आहे. तयामुळे सदर दोन्ही ठिकाणचे आठवडी बाजार आज भरणार नाही. चामोर्शी न.पं.च्या मुख्याधिकाऱ्यांनी तशा सूचना जारी केल्या आहेत. अहेरी तालुक्याच्या राजाराम येथे दर गुरूवारी आठवडी बाजार भरतो. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजाराम ग्रामपंचायत प्रशासनाने १८ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत आठवडी बाजार बंद करण्यात येत असल्याची सूचना जारी केली.
भामरागडात चार ठिकाणी भरला बाजार - आठवडी बाजारात लोकांची गर्दी होऊन कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरणार नाही, याची खबरदारी म्हणून बुधवारी भामरागड येथे भरणारा आठवडी बाजार वेगवेगळ्या चार ठिकाणी भरविण्यात आला. तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी नगर पंचायतच्या अधिकारी व कर्मचाºयांची बैठक घेतली. लोकांची गर्दी रोखण्यासाठी तीन ते चार ठिकाणी बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भामरागडातील बाजार बुधवारी भरला. नगर पंचायत प्रशासन, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने यासाठी सहकार्य केले. पोलीस बंदोबस्तात व्यापाºयांना वेगवेगळ्या तीन ठिकाणी दुकाने लावण्यास सूचविण्यात आले. सदर बाजारात तालुक्यातील ११० गावांमधील हजारो लोक येतात. नेहमीच्या आठवडी बाजारात काही दुकाने, जुन्या समूह निवास शाळेच्या पटांगणात, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या बाजूला झाडाखाली तसेच काही दुकाने नदीपलिकडील खुल्या जागेत दुकाने लावण्यात आली.
कुरखेडात दुकान बंदचा आदेश धडकला- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची होणारी गर्दी टाळण्याचा प्रश्न प्रशासनाच्या वतीने केला जात आहे.
किराणा, दूध, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू जसे औषधी आदींची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश कुरखेडाचे पोलीस निरीक्षक सुधाकर देढे यांनी १७ मार्चला काढले आहेत. त्यामुळे गुरूवारपासून ३१ मार्चपर्यंत कुरखेडा शहरातील पान व चहाटपरीपासून सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवावी, असे निर्देश पो.निरीक्षक देढे यांनी दिले आहेत. कुरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत असणारी सर्व दुकाने कडकडीत बंद राहणार आहेत.
सर्व पानठेले आणि खर्रा विक्री बंद
कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा (१८९७) लागू केल्याने खर्रा, सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी यांचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीवर एक वर्षाकरिता प्रतिबंध लावला आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात सर्व पानठेले आणि खर्रा विक्री केंद्र बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.
याशिवाय जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्रे १७ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केल्यानंतर साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी प्रशासन अनेक बाबींवर निर्बंध लादू शकतात. त्याची अंमलबजावणी बंधनकारक राहणार आहे.