भामरागडातील बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:25 AM2021-07-01T04:25:31+5:302021-07-01T04:25:31+5:30
सतत तीन दिवस बाजारपेठ बंद असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. प्रशासनाने आंदोलनाची अजून कोणतीही ...
सतत तीन दिवस बाजारपेठ बंद असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. प्रशासनाने आंदोलनाची अजून कोणतीही दखल घेतलेली नाही. लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने १२८ गावांतील नागरिकांशी थेट संबंधित भामरागड बाजारपेठ अजूनही बंद आहे.
भामरागडला लागून असलेल्या पर्लकोटा नदीवरील ठेंगण्या पुलामुळे पावसाळ्यात वारंवार संपर्क तुटत होता. त्यामुळे उंच पुलाची मागणी फार वर्षांपासून होत होती. सदर पूल मंजूर होऊन बांधकामास सुरुवात झाली. मात्र यामध्ये काही व्यापाऱ्यांची दुकाने व घरे पूर्णपणे जाणार आहे. तसेच रस्ते बांधकाम मोठ्या धरणासारखे होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला असलेली दुकाने बेकामी होऊन फार मोठे नुकसान होणार आहे.
पूल व रस्त्याला विरोध नसून अनेक वर्षांपासून घरे बांधून राहतात, त्यांच्या घरांची नुकसानभरपाई व पर्यायी जागा द्यावी, दुकान लाइन एकत्र मार्केट बसविण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करावी, या मागण्यांसाठी व्यापाऱ्यांकडून सोमवारपासून दुकाने बंद ठेवून धरणे आंदाेलन करण्यात येत आहे. सतत तीन दिवस बाजारपेठ बंद असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. मात्र प्रशासनाने आंदोलनाची अजून कोणतीही दखल घेतलेली नाही.
काही नेतेमंडळींनी भेट दिली. वरिष्ठांना सांगून समस्या सोडवु, असे आश्वासन मिळत आहे. पण प्रत्यक्षात कोणतीही कृती होताना दिसत नाही. या आंदाेलनात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, उपाध्यक्ष रमेश मारगोनवार, सचिव सलीम शेख, सहसचिव आसीफ सुफी, संदीप मोगरे, मनोज मंडल, अरण बोस, बबलू शेख, प्रदीप करमाकार, सुरेश कोडापे, शकील शेख, सुजित डे, संतोष मद्दर्लेवार, बहादूर आत्राम अन्य पदाधिकारी व दुकानदार सहभागी झाले आहेत.
(बॉक्स)
प्रशासन म्हणते, मालकी हक्क देता येत नाही
वनविभागाच्या जागेवर असल्याने आम्हाला मालकी हक्क देता येत नाही. वनविभागानेसुध्दा आमच्याकडे जागा नाही म्हणून जागा खाली सोडून दिली. तालुका घोषित झाल्यानंतर आजूबाजूच्या गावातील सुशिक्षित बेरोजगार रोजगार शोधत खुल्या जागेत दुकान मांडून उदरनिर्वाह करीत आहेत. झोपडीचे रूपांतर घरात झाले. काेणी पक्के घरे बांधले, तर कोणी दुमजली बिल्डिंग बनवतानाही कोणी हरकत घेतली नाही. आता कुठून आले वनविभाग, घरे काढण्यासाठी नाहरकत देणार कोण, गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून इथे राहत आहोत तर मालकी हक्क कोण देणार, शासन की, प्रशासन, असे अनेक प्रश्न व्यापारी व नागरिक करीत आहेत. तालुकानिर्मिती झाल्यापासून रोजगारासाठी येऊन इथे झोपडीत राहात होतो, तेव्हा मतदान ओळखपत्र बनवले. जेव्हा मतदान करताना आम्हाला पुराव्याची गरज पडली नाही असे व्यापारी सांगतात.
(बाॅक्स)
संदीप कोरेत यांनी दिली भेट
भामरागड येथील त्रिवेणी व्यापारी संघटनेच्या धरणे आंदोलनाला भाजपचे जिल्हा सचिव संदीप कोरेत यांनी भेट दिली. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भामरागडातील नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्या मांडणार, असे आश्वासन संदीप कोरेत यांनी दिले. यावेळी वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा केली. यावेळी संघ संयोजक अमित बेजलवार, अहेरी पं. स.चे सभापती भास्कर तलांडी आदी हजर होते.