झाडीपट्टीतील मंडई, नाटकांवर घाेंघावतेय ओमायक्रॉनचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 05:00 AM2021-12-09T05:00:00+5:302021-12-09T05:00:54+5:30
भाऊबीजेच्या सणापासून एक महिना अनेक ठिकाणी नाटकांचे व मंडईचे आयोजन केले होते. पण, आता देशातील काही मोठ्या शहरांमध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग दिसून येत असल्याने प्रशासनाने नवीन निर्बंध घातले. त्यात झाडीपट्टीतील मंडई, नाटक कचाट्यात सापडले आहे. आता संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी झाल्यास सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मंडई, नाटकांसाठी दिली जाणारी परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे.
प्रदीप बोडणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : दिवाळीचा सण आटोपताच पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मंडई व नाटकांची रेलचेल असते. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गाने झाडीपट्टीची रंगभूमी ओस पडली होती. या वर्षी पुन्हा मंडई आणि नाटकांना चांगले दिवस येतील असे वाटत असतानाच ओमायक्रॉनचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समस्त नाट्यकलावंत आणि नाटकांवर विसंबून असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
भाऊबीजेच्या सणापासून एक महिना अनेक ठिकाणी नाटकांचे व मंडईचे आयोजन केले होते. पण, आता देशातील काही मोठ्या शहरांमध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग दिसून येत असल्याने प्रशासनाने नवीन निर्बंध घातले. त्यात झाडीपट्टीतील मंडई, नाटक कचाट्यात सापडले आहे. आता संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी झाल्यास सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मंडई, नाटकांसाठी दिली जाणारी परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे.
अनेक मंडळांनी नाटक, मंडईच्या तारखा निश्चित केल्या आहेत. त्याची पत्रकेही काढून जय्यत तयारी झाली आहे. पण, संसर्ग वाढल्यास खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विभागाने नाटकासाठी दिली जाणारी परवानगी नाकारल्यास झाडीपट्टीतील अनेकांवर पुन्हा उपासमारीची पाळी येणार आहे.
मागील दोन वर्षांपासून झाडीपट्टीतील नाट्यवेड्या रसिकांचा हिरमोड होत आहे. या वर्षात कोरोनाचा संसर्ग अत्यल्प प्रमाणात झाला असताना आता ओमायक्रॉनच्या भीतीने नाटकाचा अंक बंद होण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने खुल्या जागेवरील कार्यक्रमांसाठी क्षमतेपेक्षा २५ टक्के उपस्थितीचा नियम नुकताच लागू केला आहे.
सुगीच्या दिवसात मनोरंजन
झाडीपट्टीत भाऊबीजेपासून दिवसा गावात मंडई आणि रात्री मनोरंजनासाठी नाटकाचा प्रयोग आयोजित केला जातो. खरिपाचा हा हंगाम आटोपला की झाडीपट्टीच्या माणसासाठी हा काळ म्हणजे आनंदाची पर्वणी असते. १२ महिने शेतात राबणाऱ्या माणसासाठी हा सुगीचा काळ असतो. आपल्या गावात नाटक, मंडई व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. झाडीपट्टीचा माणूस आपल्या पदरचे चार पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहात नाही. त्यानिमित्ताने पाहुण्यांच्या गाठीभेटी, रोटीबेटीचे व्यवहार चालतात.
झाडीपट्टीवर बेरोजगारीचे सावट
दोन ते अडीच महिन्यांच्या काळात झाडीपट्टीच्या रंगभूमीवरील लेखक-कलावंत, नेपथ्य, डेकोरेशन अशा दोन हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळतो, तो कोरोनाने हिरावला आहे. मंडईत अनेकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसाय निर्बंधांमुळे बंद होण्याची शक्यता आहे. झाडीपट्टीत नाटक, मंडईबरोबर गावातील लोककला प्रकार, दंडार, तमाशा, गोंधळ या लोकप्रकारांतील कलाकारांवरही बेरोजगारीची वेळ येऊ शकते.