बाजार समिती निवडणूक : गडचिरोलीत महाविकास आघाडीसमोर पहिले आव्हान 'डॅमेज कंट्रोल'चे

By संजय तिपाले | Published: April 17, 2023 03:37 PM2023-04-17T15:37:32+5:302023-04-17T15:42:38+5:30

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निघणार तोडगा

Market Committee Election: The first challenge before Mahavikas Aghadi in Gadchiroli is 'Damage Control' | बाजार समिती निवडणूक : गडचिरोलीत महाविकास आघाडीसमोर पहिले आव्हान 'डॅमेज कंट्रोल'चे

बाजार समिती निवडणूक : गडचिरोलीत महाविकास आघाडीसमोर पहिले आव्हान 'डॅमेज कंट्रोल'चे

googlenewsNext

गडचिरोली : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधू रवींद्रबाबा आत्राम यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे,  दुसरीकडे काँग्रेसमध्ये इच्छुकांचा भरणा वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. 'डॅमेज कंट्रोल'साठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती आहे. 

 जिल्ह्यात पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गडचिरोली, चामोर्शी, अहेरी व आरमोरी बाजार समितीसाठी २८ एप्रिलला मतदान तर २९ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे. सिरोंचा बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान हाेणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.

गतवेळी गडचिरोली बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा होता, आरमोरी, सिरोंचात भाजपच्या हाती सत्ता होती. चामोर्शीत अपक्ष अतुल गण्यारपवार यांचा  'वन मॅन' कारभार आहे. अहेरीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची हुकूमत होती. मात्र, पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. सहकार क्षेत्रातील 'किंगमेकर' पोरेड्डीवार घराणे गतवेळी काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपकडून आहेत.

जिल्ह्यात एक खासदार, दोन आमदार तसेच केंद्र व राज्यात सत्ता अशा जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत, यातच आमदार धर्मरावबाबा यांचे बंधू माजी जि.प.उपाध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्रबाबा आत्राम यांनी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उध्दव ठाकरे गटाचे नेते एकत्रित येणार आहेत. ही बैठक १८ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नाराजांची मनधरणी करुन महायुतीचा सामना कसा करायचा याची व्यूहरचना आखली  जाऊ शकते. 

२० एप्रिलकडे सर्वांचे लक्ष

पाच कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील संचालकपदाच्या ९० पैकी गडचिरोली व सिराेंचा येथील प्रत्येकी एक अशा दोन जागा बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित ८८ जागांसाठी २८० उमेेदवार आखाड्यात आहेत.  ६ ते २० एप्रिल हा नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अवधी आहे. २० एप्रिलही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Market Committee Election: The first challenge before Mahavikas Aghadi in Gadchiroli is 'Damage Control'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.