वैरागड येथे बाजार समितीचे धान खरेदी केंद्र सुरू
By admin | Published: December 26, 2015 01:34 AM2015-12-26T01:34:19+5:302015-12-26T01:34:19+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीच्या वतीने वैरागड येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राचा ...
क्रिष्णा गजबे यांची माहिती : मुख्यमंत्र्यांनी धानाला प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केला
वैरागड : कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीच्या वतीने वैरागड येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राचा शुभारंभ आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक खिरसागर नाकाडे, उपमुख्य प्रशासक ईश्वर पासेवार, सचिव अ. द. निमजे, जिल्हा परिषद सदस्य पुनम गुरनुले, सरपंच गौरी सोमनानी, धनबाते, नत्थेखान पठाण, प्रशासक मुकेश वाघाडे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार क्रिष्णा गजबे यांनी शेतकरी संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी धानाला प्रती क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केला आहे. हा बोनस केवळ सरकारी खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन केले.
समितीचे मुख्य प्रशासक खिरसागर नाकाडे म्हणाले की, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची येथे संचयन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी मार्केट यार्ड बांधण्यात आले आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी मागणी केल्यास आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा येथे उपबाजार घोषीत केले जाईल, अशी माहिती दिली.
संचालन विनायक गरफडे तर आभार संस्थेचे सचिव अमिश निमजे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर दहीकर, माणिक धनबाते, धनंजय कुथे, अमोल ठवकर, गोवर्धन चनेकर, पुरूषोत्तम दुपारे, गिरीधर पत्रे, अक्षय बडगे, नंदू बांडेबुचे, प्रभाकर आठवले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला वैरागड, मोहझरी, सुकाळा, विहिरगाव, लोहारा येथील धान उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)