पुलांमुळे सिरोंचा तालुक्याची मार्केटिंग तेलंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:13 AM2019-05-12T00:13:47+5:302019-05-12T00:14:29+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक विविध व्यवसाय, उद्योगधंदे व अन्य कौंटुंबिक कामाकरिता तेलंगणा राज्यात पूर्वी पुलाअभावी जात नव्हते. परंतु दोन वर्षापूर्वी गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्याने तालुक्यातील मार्केटिंग तेलंगणात वाढली.
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या अंतिम टोकावर व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक विविध व्यवसाय, उद्योगधंदे व अन्य कौंटुंबिक कामाकरिता तेलंगणा राज्यात पूर्वी पुलाअभावी जात नव्हते. परंतु दोन वर्षापूर्वी गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्याने तालुक्यातील मार्केटिंग तेलंगणात वाढली. केवळ कार्यालयीन कामाकरिता नागरिकांना गडचिरोली येथे जावे लागते.
अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांचा संपर्क थेट तेलंगणा राज्याशी येत असल्याने ते नेहमी तेथे जात असतात. सिरोंचा तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या तीन नद्या आहेत. गोदावरी, प्राणहिता या नद्यांवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अन्य एक पूल अंतिम टप्प्यात असून तो या वर्षाच्या शेवट पूर्णत्त्वास येणार आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हा मुख्यालय अडीचशे किमी लांब आहे. त्यामुळे दक्षिण गडचिरोली भागातील नागरिक तेलंगणा राज्यातच रोटी-बेटीचे संबंध जोडतात. त्यामुळे पुलाच्या मार्गावरून नेहमीच वर्दळ दिसून येते. सिरोंचा तालुक्यातील नागरिक लग्न समारंभ यासह विविध कामांकरिता कापड खरेदी तसेच अन्य साहित्य खरेदी करण्याकरिता तेलंगणा राज्यातील वरंगल, करिमनगर तसेच हैद्राबाद येथे जातात. विशेष म्हणजे, वरंगल १०५, करिमनगर १२८ व हैद्राबाद २५० किमी अंतरावर आहे. या शहरांमध्ये आवश्यक वस्तू उपलब्ध असल्याने तालुक्यातील नागरिक गडचिरोली अथवा अहेरी येथे येण्यापेक्षा तेलंगणा राज्यातील या शहरांमध्ये जाणे योग्य समजतात. याशिवाय आरोग्यसोयीच्या दृष्टीने वरंगल येथे सुविधायुक्त शासकीय रूग्णालय असल्याने अहेरी उपविभागातील बहुतांश रूग्ण उपचारासाठी तेथे जातात.
शिक्षणासाठीही पसंती
सिरोंचा तालुक्यातील गर्भश्रीमंत व्यक्तींची मुले उच्च शिक्षणाकरिता हैद्राबाद, वरंगल येथे जातात. या शहरांमध्ये जाऊन इंग्रजी माध्यमातून उच्च शिक्षण घेतात. महाराष्टÑाच्या तुलनेत तेलंगणा राज्याचा विकास जलदगतीने होत आहे, असा समज तालुक्यातील बहुतांश लोकांचा आहे. त्यादृष्टीने ते गडचिरोली जिल्ह्यात विविध कामानिमित्त जाण्यापेक्षा तेलंगणा राज्य निवडतात. असे असले तरी तालुक्यातील बहुतांश नागरिक विविध कामाकरिता तेलंगणा राज्यात जात असल्याने या राज्यातील लोकांशी तालुक्यातील नागरिकांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत असल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येते.
खरेदी-विक्रीचेही व्यवहार
सिरोंचा तालुक्यातील नागरिक तेलंगणा राज्यात व्यवसाय व अन्य कामाकरिता जात असले तरी तेलंगणा राज्यातील अनेक लोकांनी सिरोंचा तालुक्यात प्लॉट व शेतीची खरेदी केलेली आहे. दक्षिण गडचिरोली विभागातील लोकांनीही तेलंगणा राज्यात आपला मोर्चा वळविला आहे. तेलंगणा राज्याशी सिरोंचा तालुक्याची नाळ जुळत आहे. याचाच परिणाम अहेरी विधानसभा क्षेत्र तेलंगणा राज्यात समाविष्ट करण्याची मागणीही जोर धरत आहे.