दिव्यांगांशी लग्न; ५० हजारांचे अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:23 PM2024-06-27T18:23:32+5:302024-06-27T18:24:51+5:30
Gadchiroli : दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास योजनेचा लाभ
गडचिरोली : दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साह्य योजनेअंतर्गत जि. प. समाज कल्याण विभागातर्फे ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग अव्यंग यांच्या विवाहास प्रोत्साहन देऊन समाजातील दिव्यांगांप्रति सन्मानाची भावना बळकट केली जात आहे.
कोणाला मिळतो लाभ?
किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास योजनेचा लाभ दिला जातो. वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा, अशी पात्रतेची अट आहे.
किती व कशा स्वरुपात मिळते अनुदान
• या योजनेअंतर्गत प्रत्येक जोडप्यास २५ हजारांचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रुपये रोख, ४ हजार ५०० रुपये संसारोपयोगी साहित्य व वस्तू खरेदीसाठी दिले जातात. तर ५०० रुपये स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येतात.
पाच महिन्यांत दहा जोडप्यांना वाटप
• जि.प. समाज कल्याण विभागाकडे प्राप्त झालेल्या एकूण प्रस्तावांपैकी प्राधान्यक्रमानुसार दिव्यांग अव्यंग १० जोडप्यांना ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आला.
• पाच महिन्यांतील ही संख्या आहे, यापुढील जोडप्यांना पुढील वर्षी अनुदानप्राप्तीनुसार मदत दिली जाणार आहे.
दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून, दिव्यांग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे, यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, याकरिता आंतरजातीय विवाह करणाऱ्या
जोडप्यांना आर्थिक साह्य दिले जाते.
- आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., गडचिरोली