विवाहित तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने हत्या, मृतदेह कालव्यात फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 10:53 PM2022-10-12T22:53:30+5:302022-10-12T22:54:24+5:30
प्राप्त माहितीनुसार, मृत आशिष हा मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर जाऊन येतो, असे सांगून स्वतःच्या दुचाकी क्रमांक (एमएच ३३, आर ८१८६)ने गेला. परंतु, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू असताना सकाळी भगतसिंह वाॅर्ड ते तुकुम वाॅर्डलगत असलेल्या कालव्यात एक मृतदेह पडलेला असून, बाजूला दुचाकी असल्याचे काही लोकांना दिसले. दुचाकीच्या नंबरवरून ती आशिषचीच असल्याचे पोलिसांनी ओळखले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शहरातील भगतसिंग वॉर्डमधील रहिवासी आशिष रवी मेश्राम (२४ वर्षे) या विवाहित तरुणाची मंगळवारी रात्री डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह शहरालगतच्या कालव्यात टाकून देण्यात आला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याची हत्या कशासाठी झाली आणि कोणी केली, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत आशिष हा मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर जाऊन येतो, असे सांगून स्वतःच्या दुचाकी क्रमांक (एमएच ३३, आर ८१८६)ने गेला. परंतु, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू असताना सकाळी भगतसिंह वाॅर्ड ते तुकुम वाॅर्डलगत असलेल्या कालव्यात एक मृतदेह पडलेला असून, बाजूला दुचाकी असल्याचे काही लोकांना दिसले. दुचाकीच्या नंबरवरून ती आशिषचीच असल्याचे पोलिसांनी ओळखले. दरम्यान, देसाईगंज पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीत मृतदेहाच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राचे घाव दिसून आले. त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
मृत आशिष मेश्राम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व मुलगा असा आप्तपरिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुजाता भोपळे करत आहेत.
मारेकरी तीनपेक्षा जास्त असण्याची शक्यता
- मृत आशिष हा शरीरयष्टीने दणकट होता. त्यामुळे त्याला मारणारे एक-दोन लोक नसून किमान तीन किंवा त्यापेक्षा जास्त लोक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनास्थळाजवळच असलेल्या त्याच्या दुचाकीचा हेडलाईट फुटलेला होता. कोणत्या तरी वादातून त्याची हत्या झाल्याची शक्यता असून, तो वाद कोणता हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
व्यावसायिक कारणातून झाली हत्या?
- मृत तरुण हा अनधिकृत दारूविक्रीच्या व्यवसायात गुंतलेला होता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे व्यावसायिक व्यवहार किंवा स्पर्धेतून तर त्याची हत्या झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला असून, त्याचे शेवटचे लोकेशन, शेवटी आलेले कॉल डिटेल्स यावरून आरोपींचा शोध घेणे पोलिसांकरिता सोपे होणार आहे. त्यासाठी मोबाइलचा सीडीआर मागविण्यात आला आहे.
रात्री ९ वाजल्यापासून आशिषचा मोबाइल बंद
- लवकरच येतो, असे सांगून रात्री ८ वाजता घरून गेलेला आशिष परत न आल्यामुळे घरच्यांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क केला असता, रात्री ९ वाजल्यापासून त्याचा मोबाइल सातत्याने बंद असल्याचे दाखवत होता. त्यामुळे त्याचवेळी त्याची हत्या झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावरून जवळपास १० ते ११ तास मृतदेह कालव्याच्या पाण्यात पडून होता.