मास्क, लसीकरणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:00:51+5:30
नवीन आदेशानुसार, पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क लावल्याशिवाय आणि लस घेतल्याशिवाय वावरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, याशिवाय इतरही अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी संजय मिना यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने नवीन निर्बंधाबाबत ३० नोव्हेंबरला आदेश जारी केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरोनाच्या निर्बंधाचे योग्य पद्धतीने पालन झाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे प्रशासनाने बरेच निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, आता कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता पाहता, जिल्हा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार नवीन आदेश काढून काही निर्बंध लागू केले आहेत.
नवीन आदेशानुसार, पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क लावल्याशिवाय आणि लस घेतल्याशिवाय वावरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, याशिवाय इतरही अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी संजय मिना यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने नवीन निर्बंधाबाबत ३० नोव्हेंबरला आदेश जारी केला.
तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमात, समारंभाला किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित सर्व व्यक्ती, तसेच सर्व सेवा प्रदाते, तसेच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्तींना संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय प्रवेश राहणार नाही. कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचेही संपूर्ण लसीकरण झालेले असावे.
सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. याशिवाय छायाचित्र असलेले कोविन प्रमाणपत्रही त्यासाठी वैध पुरावा मानला जाईल.
सभागृहांमध्ये ५० टक्के तर खुल्या जागेत २५ टक्केच उपस्थिती
चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह इत्यादी बंदिस्त जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या, उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना उपस्थित राहण्याची अनुमती असेल. खुल्या असलेल्या जागांवरील समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्केच लोकांना उपस्थित राहण्याची अनुमती असेल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल, तर (स्टेडियमप्रमाणे) अशी क्षमता ठरविण्याचा अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असेल.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे लक्षात ठेवा...
नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. मास्कऐवजी रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र असेल.
शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर (किमान ६ फूट) राखा.
साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ धुवा, त्याशिवाय नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा, कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार करा.
योग्य स्वच्छता राखा, खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा
जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल, तर त्याने स्वतःचा हात नव्हे, तर हाताचा वाकवलेला कोपरा नाका-तोडांवर ठेवून खोकावे व शिंकावे.
संपूर्ण लसीकरण म्हणजे काय?
संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ, लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत अशी व्यक्ती होय. दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर किमान १४ दिवस झालेले आहेत अशा व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण झाले असे समजले जाईल. ज्या व्यक्तीची वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्या व्यक्तीला लस घेणे शक्य नाही त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र असणे आवश्यक राहणार आहे.
अशी आहे दंडाची तरतूद
- कोरोनाच्या बाबतीत योग्य वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, ५०० रुपये दंड करण्यात येईल.
- दुकान, सभागृहात येणाऱ्या ग्राहकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यासोबत संस्थांना किंवा आस्थापनांनासुद्धा १० हजार रुपयांचा दंड करण्यात येईल.
- नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले, तर एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
- जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वत:च कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रुपये ५० हजार इतक्या दंडास ते पात्र असतील.
- जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर होत असल्याचे आढळून आले तर, त्या प्रवाशास ५०० रुपये दंड करण्यात येईल.