राष्ट्रभाषेवर प्रभुत्व निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:03 PM2018-03-24T23:03:57+5:302018-03-24T23:03:57+5:30
हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने ती सर्वसामान्य व्यक्तीला अवगत होणे आवश्यक आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी राष्ट्रभाषेत प्रभुत्व निर्माण करावे. भाषा व्यक्तीला समृध्द करते. भाषा समृध्द करण्यासाठी अवांतर वाचन करावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने ती सर्वसामान्य व्यक्तीला अवगत होणे आवश्यक आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी राष्ट्रभाषेत प्रभुत्व निर्माण करावे. भाषा व्यक्तीला समृध्द करते. भाषा समृध्द करण्यासाठी अवांतर वाचन करावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
खासदार अशोक नेते यांनी स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील शाळांसाठी हिंदी पुस्तके खरेदी करण्यासाठी २२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला होता. या पुस्तकांचे वितरण २४ मार्च रोजी शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, उपशिक्षणाधिकारी संजय भिलकर, प्राचार्य संजय नार्लावार, सुनील पोरेड्डीवार, स्वप्नील वरघंटे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रभाषा हिंदीच्या प्रचार व प्रसाराकरिता १०८ शाळा, महाविद्यालयांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांकरिता सहा लाख रूपयांची पुस्तके, हायस्कूलकरिता आठ लाख रूपये व महाविद्यालयांना आठ लाख रूपयांचे पुस्तके दिली जाणार आहेत. प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी संजय भिलकर तर आभार साइ कोंडावार यांनी मानले.