दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:04 AM2019-09-11T00:04:30+5:302019-09-11T00:04:52+5:30

जिल्ह्यातील तीनही शिबिराकरिता १०० टक्के विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेषतज्ज्ञ, संसाधन शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Material for the handicapped students | दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार साहित्य

दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार साहित्य

googlenewsNext
ठळक मुद्दे२९३ विद्यार्थ्यांना होणार लाभ : देसाईगंज, आलापल्ली व गडचिरोलीत मोजमाप शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : समग्र शिक्षा अभियानांतर्गत विशेष दर्जा असणाऱ्या जिल्हाभरातील प्राथमिक व माध्यमिकस्तरावरील २९३ दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण केले जाणार आहे. यासाठी देसाईगंज येथे १६ सप्टेंबर, आलापल्ली १७ तर गडचिरोली येथे १८ सप्टेंबर रोजी मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करायचे आहे. गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण देताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल प्लॉॅसी, अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना स्नायू व सांध्याअंतर्गत तीव्र दोष असलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य वितरित केले जाते. मोजमापानुसार साहित्य करून दिल्यास त्यांच्या शरीराची स्थिती टिकण्यास मदत होते. तसेच अध्ययन प्रक्रिया सुलभ होऊन अध्ययन प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यास मदत होईल.
यापूर्वी काही विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र वय वाढल्यामुळे कॅलिपर, कुबड्या, व्हिलचेअर, रोलेटर हे साहित्य उपयोगात येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून प्राप्त झाल्या. त्यानुसार पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तीनही शिबिराकरिता १०० टक्के विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेषतज्ज्ञ, संसाधन शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना साहित्य साधनांची आवश्यकता आहे, परंतु अपंगत्वाच्या तीव्रतेमुळे सदर विद्यार्थी शिबिरस्थळी उपस्थित राहू शकत नाही, अशा विद्यार्थ्याच्या पालकांना अ‍ॅलिम्को प्रपत्र भरून आणावे लागणार आहे. सोबत आधारकार्ड, अपंगत्व प्रमाणपत्र नसल्यास अर्जावर विद्यार्थी, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी यांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे, असे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सदर शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे. मोजमापानुसार साहित्य मिळाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्याला होणार असल्याने विद्यार्थी उपस्थित असणे योग्य ठरणार आहे.
विद्यार्थ्यांनी सोबत आणायचे दाखले
तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडील पालकाच्या उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड किंवा मदतदान ओळखपत्र यापैैकी एक दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार दिव्यांगत्व दिसेल असे दोन पासपोर्ट साईज फोटोे, ज्या विद्यार्थ्याकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र नाही, अशा विद्यार्थ्याची माहिती परिशिष्ठ द मध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीनिशी परिपूर्ण भरून सोबत आणावी. शिबिराला उपस्थित पालक व विद्यार्थी यांना अल्पोपहारासह ा्रवास भाडेही शिबिरस्थळी देण्यात येणार आहे.
१६ सप्टेंबर रोजी आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची या तालुक्यांचे देसाईगंज येथील गटसाधन केंद्रात मोजमाप शिबिर होणार आहे. १७ सप्टेंबर रोजी मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यांचे आलापल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळा व १८ सप्टेंबर रोजी गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांचे शिबिर जिल्हा परिषद हायस्कूल, गडचिरोली येथे होणार आहे.

Web Title: Material for the handicapped students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.