गणिताच्या सूत्रांनी भिंती झाल्या बाेलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:33 AM2021-04-03T04:33:04+5:302021-04-03T04:33:04+5:30
कुरूड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने बहुतेक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना वाईट सवयी ...
कुरूड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने बहुतेक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना वाईट सवयी लागू शकतात. या समस्येची दखल घेत देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील सरपंचांनी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविली आहे. गणितातील सूत्रे विद्यार्थ्यांना समजावित यासाठी गावातील भिंतींवर सूत्रे लिहिण्यात आली. त्यामुळे भिंती बोलक्या झाल्या आहेत.
कोंढाळा गावातील सरपंचांनी मॅथेमॅटिशनचे संस्थापक अक्षय वाकुडकर यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सांगितल्या. हा उपक्रम आपल्या गावामध्ये राबविण्याचा आग्रह केला. वाकुडकर यांनी होकार देऊन १ ते २ एप्रिल राेजी प्रत्यक्ष गावामध्ये येऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून उपक्रमाला सुरूवात केली. मिशन मॅथेमॅटिशनच्या मदतीने कोंढाळा येथील सर्वच रिकाम्या भिंती रंगवून बोलक्या करण्यात आल्या. ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. तसेच गावातील विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे. जिल्ह्यात अतिदुर्गम भागात गरिबीमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे शाळा बंद झाल्यावर विद्यार्थी शाळेबाहेर असताना भिंतीवर असलेले सूत्र लक्षात ठेवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाविषयी असलेली भीती दूर हाेण्यास मदत हाेणार आहे. गावातील चौकात व प्रत्येक रस्त्यालगतच्या भिंतीवर गणिताचे सूत्र लिहून विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील, अशी अपेक्षा कोंढाळाच्या सरपंच अपर्णा नितीन राऊत यांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी उपसरपंच गजानन सेलाेटे, ग्रामसेवक नारायण मडावी, ग्रा.पं. सदस्य संदीप वाघाडे, शेषराव नागमोती, गोकुलदास ठाकरे, प्रफुल मेश्राम, नलिना वालदे, प्रतिभा राऊत, शिल्पा चौधरी, भूमेश्वरी गुरनुले, कल्पना झिलपे, विद्यार्थी गिरीष भजनकर, संदीप ढोंगे, मदन पचारे, अनुराग बुराडे, प्रियंका ठाकरे, रिमझिम बुराडे यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
संकल्पना व संबाेध रेखाटण्याची गरज
काेराेनामुळे प्राथमिक शाळा बंद आहेत. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गणित विषयातील सूत्रे भिंतींवर लिहिण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास हाेण्यास मदत मिळणार आहे. गणित विषयासह अन्य विषयातील संबाेध व संकल्पना भितींवर रेखाटल्यास पुन्हा विद्यार्थ्यांना फायदेशीर हाेऊ शकते. यादृष्टीने प्रशासनाने विचार करावा, अशी आशा पालक बाळगून आहेत.