बाह्य परीक्षणातून गणित शिक्षकांना वगळले

By admin | Published: February 10, 2016 01:35 AM2016-02-10T01:35:36+5:302016-02-10T01:35:36+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने ११ ते २७ फेब्रुवारीदरम्यान इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.

Mathematics teachers excluded from external examinations | बाह्य परीक्षणातून गणित शिक्षकांना वगळले

बाह्य परीक्षणातून गणित शिक्षकांना वगळले

Next

दहावीची विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा : नागपूर बोर्डाचा भोंगळ कारभार
आष्टी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने ११ ते २७ फेब्रुवारीदरम्यान इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी दरवर्षी बाह्य व अंर्तपरीक्षक म्हणून गणित व विज्ञान शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत होती. मात्र यंदा केवळ विज्ञान शिक्षकांचीच परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे गणित शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी गणित व विज्ञान शिक्षकाची नियुक्ती करण्यात येत होती. मात्र २०१२ पासून बाह्य अंर्तपरिक्षक म्हणून शिक्षकांना पाठविणे बंद करण्यात आले. त्यानंतर यावर्षीपासून पुन्हा नागपूर बोर्डाने विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरविले. त्यानुसार बोर्डाकडून बाह्य परीक्षकांचे नियुक्ती पत्र पाठविण्यात आले. यामध्ये अनेक शाळेतील केवळ विज्ञान शिक्षकांचीच बाह्य परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. एका विज्ञान शिक्षकाची तीन ते चार ठिकाणी बाह्य परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र गणित शिक्षकांना बाह्य परीक्षक म्हणून वगळण्यात आले आहे.
गणित शिक्षक हा शाळेमध्ये विज्ञान भाग एक हा विषय शिकवित असतो. आणि यापूर्वी गणित शिक्षकांचीसुध्दा बाह्य व अंतर्परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येत होती. मग या वर्षीच का नाही. यामागचे कारण मात्र कळू शकले नाही.
एकाच विज्ञान शिक्षकाची तीन ते चार ठिकाणी बाह्य परीक्षक म्हणून नियुक्ती करून चार ठिकाणीची परीक्षा घेणे शिक्षकांना त्रासदायक नाही का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या सर्व बाबीचा नागपूर शिक्षण बोर्डाने विचार करणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंर्तपरिक्षक म्हणून विज्ञान शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष घालून गणित शिक्षकांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी जिल्ह्यातील गणित विषयाच्या शिक्षकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mathematics teachers excluded from external examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.