'मावा इदु मंदाना जागा'; जेव्हा पोलिस ठाणे बनते हक्काचे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:18 AM2020-12-01T11:18:02+5:302020-12-01T11:19:13+5:30
Gadchiroli News मावा इदु मंदाना जागा माडिया भाषेतील हे वाक्य आहे माली घासी उसेंडी यांचे. मराठीमधून याचा सरळ सरळ अर्थ पोलीस स्टेशन लाहेरी हे आमच्यासाठी हक्काचे आश्रयस्थान आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: मावा इदु मंदाना जागा माडिया भाषेतील हे वाक्य आहे माली घासी उसेंडी यांचे. मराठीमधून याचा सरळ सरळ अर्थ पोलीस स्टेशन लाहेरी हे आमच्यासाठी हक्काचे आश्रयस्थान आहे. अलंकाराचा अभाव असलेले हे वाक्य एक आदिवासी महिलेचा गडचिरोली पोलीस दलाबद्दल असलेल्या विश्वास आणि कृतज्ञतेने संपूर्ण अलंकृत झाले आहे.
लाहेरी हे आजूबाजूच्या दुर्गम भागात पस्तीस असलेल्या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे 1 ली ते 12 वि पर्यंत निवासी आश्रमशाळा, स्वस्त धान्य दुकान, तलाठी मुख्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्टॉप आणि छोट्या मोठ्या किराणा व जीवनोपयोगी वस्तू मिळण्याचे एकमेव ठीकाण आहे. यातच लाहेरी पोलिसांचे पाठपुराव्याने महाराष्ट्र बँकेची अल्ट्रा स्मॉल ब्रँच काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. त्यामुळे विविध कामांसाठी दूरवरून अगदी 30 ते 40 किमी ची पायपीट करत नागरिक समूहाने येतात.
मुक्काम करण्यासाठी ते आपापसात छोटे गट बनवून येथील ओळखीच्या आपल्या गरिब बांधवांकडे मुक्काम करतात. परंतु इथेच सर्व थांबत नाही. पुढचा प्रश्न असतो तो जेवणाचा. आधीच हलाखीचे जीवन जगत असलेले लाहेरीचे आदिवासी बांधव इच्छा असतानाही जेवणाची सोय करण्यात किती पुरे पडणार! मग अशावेळी हक्काचा एकच पर्याय उरतो तो म्हणजे उप पोलीस स्टेशन लाहेरी.
दि 29/11/2020 सकाळी 7.00 वा लाहेरीपासून 25 किमी दूर असलेल्या फोदेवाडा येथून सुमारे 60 नागरिक, ज्यामध्ये महिला, पुरुष आबालवृद्ध सर्व होते. त्यातच वयाची 50 ओलांडलेल्या माली घासी उसेंडी देखील होत्या, पायी चालत लाहेरीत आले. दिवसभरात कामे उरकून घेतली. संध्याकाळी 6.00 वाजले. जेवणाची सोय काय? अशावेळी सर्वांनी उप पोलीस स्टेशन गाठले.
सर्वांना पुरेल इतका शिधा पोलीस स्टेशन कडून पुरवण्यात आला व दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी निमंत्रण ही मिळाले.
दुसरे दिवशी सकाळी 8.00 वा सर्वांनी उपस्थिती लावली. यंदाची दिवाळी आदिवासी बांधवासोबत या संकल्पनेनुसार सर्वांना कपड्याचे वाटप करून नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर परतताना जेवणाची सोय म्हणून शिधा देखील पुरवण्यात आला. त्यावेळी निरोप घेतानाचे हे उद्गार मालीबाई यांचे तोडून सहजच निघाले व सर्व काही सांगून गेले. यावेळी प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी भेट दिलेल्या नागरिकांचे आभार व्यक्त केले.