नगराध्यक्ष व उपाध्यक्षाची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:59 AM2018-06-03T00:59:29+5:302018-06-03T00:59:29+5:30
चामोर्शी शहरात विविध मूलभूत व नागरी समस्या असल्याने या समस्यांचे निराकरण करून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
रत्नाकर बोमीडवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी शहरात विविध मूलभूत व नागरी समस्या असल्याने या समस्यांचे निराकरण करून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
गडचिरोली विधानसभा मतदार संघात केवळ चामोर्शी नगर पंचायतीमध्ये काँग्रेसचे पूर्ण बहुमत असतानाही ही नगर पंचायत भाजपाच्या ताब्यात गेली. काँग्रेसचे नेतृत्व कसोटीसह उतरले नाही. या उलट केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने चामोर्शी नगर पंचायतीमध्ये भाजपाला सत्तेत सहभागी करून घेतले. चामोर्शीचा विकास करता येईल. तसेच निधी खेचून आणता येईल, असा डाव टाकून काँग्रेसच्या चार नगरसेवकांना आपल्या खेम्यात घेऊन व राकाँ नगरसेविकेला भाजपात प्रवेश देऊन शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता काबिज करण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले.
चामोर्शी शहर अमर्यादीत समस्यांचे माहेरघर आहे. तुंबलेल्या नाल्या ही गंभीर समस्या आहे. पावसाळ्यात व इतर वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नाल्याद्वारे पाणी वाहून जात नाही. तर रस्त्यावर अथवा रस्त्याच्या काठावरील घरात पाणी शिरणे ही नित्याची बाब आहे. भूमिगत गटार नालीचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. कित्येक वार्डात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात नळाद्वारे उपलब्ध होत नाही. अनेक नवीन वस्तींमध्ये रस्ता व नालीचे बांधकाम झाले नाही. जनतेने आपल्या तक्रारी ‘अॅप’वर टाकून प्रशासनाला कळवाव्या म्हणून हजारो रूपये खर्च करून अॅप तयार करणारी गडचिरोली जिल्ह्यातील पहिली नगर पंचायत म्हणून दिंडोरा पिटविल्या गेला. परंतु अॅपद्वारे एकाही तक्रारीचे निवारण झाले नाही. तसेच तक्रारीही पाहिल्या जात नाही. चामोर्शी येथे स्मशानभूमीची व्यवस्था नाही. स्मशानभूमी नसल्याने कित्येकांची कुचंबणा होत असते. बसस्थानकावरील प्रसाधनगृहाची दयनिय अवस्था आहे. वाढत्या अतिक्रमणाची समस्याही मोठी आहे. क्रीडासंकूल व बसडेपो, बसस्थानक व अनेक योजनांसाठी लागणाऱ्या शासकीय जागा उपलब्ध असतानाही अतिक्रमणाच्या विळख्यामुळे या योजना शहरात कार्यान्वित होऊ शकल्या नाही. शहरात सुसज्ज नाट्यगृह व सभागृह असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ओपन स्पेसची जागा आहे. त्या वसाहतीत बालोद्यान व उद्यानाची गरज आहे. नगर पंचायतीचे स्वत:चे सुसज्ज वाचनालय असणे शहराचे वैभव असते. परंतु आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. शहराच्या सर्व रस्त्यावर स्वच्छता दिसून येत नाही. केवळ घंटागाडी फिरविल्याने स्वच्छता राहणार नाही. एक हजार कोटीचा निधी आणला तरी शहरातील समस्या सुटतील, असे म्हणता येत नाही. फुले, शाहू, आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या विचारधारेचे उच्चविद्याविभुषीत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष शहराला लाभले आहे. ते विकासाच्या कसोटीत उतरण्याची अपेक्षा आहे.