वर्धा, गडचिराेलीतील सहा नगरपंचायतींवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 08:53 PM2022-02-15T20:53:39+5:302022-02-15T20:55:02+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातील चार आणि गडचिराेलीतील नऊपैकी तीन नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्यात सर्वाधिक सहा जागांवर महाविकास आघाडीने झेप घेतली.
वर्धा / गडचिराेली : वर्धा जिल्ह्यातील चार आणि गडचिराेलीतील नऊपैकी तीन नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्यात सर्वाधिक सहा जागांवर महाविकास आघाडीने झेप घेतली. त्यापैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष, दाेन जागी शिवसेना आणि प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवाराचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला. दुसरीकडे दाेन अपक्षांनी सत्तापक्षाला मदत करीत उपाध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. गडचिराेलीत आदिवासी विद्यार्थी संघ तर वर्धेत जनशक्ती संघटनेची ‘पाॅवर’ यानिमित्ताने दिसून आली.
वर्ध्यातील चारही नगरपंचायतींवर महाविकास आघाडी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच नगरपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असताना भाजप एक तरी नगरपंचायत राखेल, अशी अपेक्षा होती. परंतु महाविकास आघाडीने इतरांनाही सोबत घेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत जिल्ह्यातील चारही नगरपंचायतींत बाजी मारली.
आर्वी विधानसभा क्षेत्रातील कारंजा (घाडगे) व आष्टी, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील समुद्रपूर, तर वर्धा विधानसभा क्षेत्रातील सेलू या चार नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. भाजपसह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या. नगरपंचायती असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत. पण, या तिन्ही विधानसभा क्षेत्रांतील चारही नगरपंचायतींवर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकविला आहे. त्यामुळे चारही नगरपंचायती आता भाजपमुक्त झाल्या आहेत. महाविकास आघाडीत पक्षांनी निवडणुका वेगवेगळ्या लढल्या तरीही सत्ता स्थापनेकरिता त्यांनी एकत्र येत, तसेच अपक्षांसोबतही हातमिळवणी करून सत्ता काबीज केली. विशेषत: कारंजा (घा.) नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवत याही निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविली आहे.