मजुरांच्या उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:42 PM2019-02-07T23:42:06+5:302019-02-07T23:42:45+5:30
एका अपघातानंतर बंद झालेले सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननाचे काम पूर्ववत सुरु करण्याच्या आश्वासनानंतर गुरूवारी तिसऱ्या दिवशी मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आरंभिलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एका अपघातानंतर बंद झालेले सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननाचे काम पूर्ववत सुरु करण्याच्या आश्वासनानंतर गुरूवारी तिसऱ्या दिवशी मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आरंभिलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आले.
लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीद्वारे सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु होते. परंतु १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रकने बसला चिरडल्याने चार जण ठार झाले. या अपघातानंतर अचानक लोहखनिज उत्खननाचे काम बंद करण्यात आले. यामुळे शेकडो मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले. त्यानंतर काम सुरु करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांना मजुरांनी एक पत्र दिले होते. काम सुरु न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही मजुरांनी दिला होता. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने अनेक मजुरांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण होते.
अखेर गुरूवारी आ.डॉ.देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, लॉयड मेटल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी लवकरात लवकर लोहखनिज उत्खनन सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी उपोषणाची सांगता केली.
सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु करण्यास लॉयड मेटल्स कंपनी व प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. या कामातून स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याचे कंपनीचे धोरण आहे. सोबतच कोनसरी येथील प्रकल्पही सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनातर्फे कार्यस्थळी पुरेशी सुरक्षा मिळाल्यास महिन्यातून २५ दिवस उत्खननाचे कार्य सुरु ठेवता येईल व त्यामुळे मजुरांना २५ दिवस रोजगार मिळेल, असे लॉयड मेटल्स कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांनी यावेळी सांगितले.