मेडिकल कॉलेज मंजूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:19 AM2018-10-17T01:19:21+5:302018-10-17T01:20:01+5:30

भौगोलिकदृष्ट्या विस्तिर्ण पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यावासीयांना वैद्यकीय सुविधेच्या बाबतीत अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज)......

Medical colleges will be approved | मेडिकल कॉलेज मंजूर होणार

मेडिकल कॉलेज मंजूर होणार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे सचिवांना कार्यवाहीचे निर्देश

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भौगोलिकदृष्ट्या विस्तिर्ण पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यावासीयांना वैद्यकीय सुविधेच्या बाबतीत अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) मंजूर करण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत.
आ.अनिल सोले यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या विषयाचे गांभिर्य सांगितले. तत्पूर्वी खा.अशोक नेते यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आणि प्रत्यक्ष चर्चेतून ही मागणी रेटली होती. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सचिवालयाला दिले आहेत.
नागपूर पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य प्रा.अनिल सोले यांनी २९ सप्टेंबर रोजी यासंदर्भात एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले होते. नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल असलेला गडचिरोली जिल्हा देशातील ११५ अविकसित जिल्ह्यांमध्ये मोडतो. १४ हजार ४१२ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या जिल्ह्याचा ७८ टक्के भूभाग जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे दळणवळणासाठी भौतिक सुविधाही पुरेशा प्रमाणात नाहीत. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधाच पोहोचत नाहीत. यातूनच आतापर्यंत शेकडो लोकांना योग्य उपचाराअभावी प्राण गमवावे लागले.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातच नाही तर जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातसुद्धा सरकारी रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरलेली नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूरला हलविले जाते. यात रुग्णांच्या नातेवाईकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताण सहन करावा लागतो. यात वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास सर्व तज्ज्ञ डॉक्टरांसह आधुनिक उपचारही येथेच मिळू शकतील. ही बाब आ.सोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रतिसाद दिला.
लोकमतने वेळोवेळी वेधले लक्ष
लगतच्या चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात मागील सरकारच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. मात्र त्यापेक्षाही गडचिरोली जिल्ह्यात याची गरज किती जास्त आहे हे अलिकडे ‘लोकमत’ने वारंवार निदर्शनास आणून दिले. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही मेडिकल कॉलेज देण्यासंदर्भात सकारात्मक हालचाली सुरू केल्या.

गडचिरोलीत मेडिकल कॉलेज मंजूर व्हावे ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष चर्चेतून अनेक वेळा ही मागणी लावून धरण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज मंजुरीसाठी हालचाली सुरू होणे ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे.
- अशोक नेते, खासदार, गडचिरोली

Web Title: Medical colleges will be approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.