शासन नियमानुसारच वैद्यकीय सेवा
By Admin | Published: June 2, 2017 01:07 AM2017-06-02T01:07:23+5:302017-06-02T01:07:23+5:30
येथील टुटेजा हॉस्पिटलमध्ये २५ मे रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास एका दीड वर्षाच्या बालकाला काही नागरिक उपचारासाठी घेऊन आले होते.
नागरिकांनी संयम बाळगावा : इंद्रजीतसिंग टुटेजा यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : येथील टुटेजा हॉस्पिटलमध्ये २५ मे रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास एका दीड वर्षाच्या बालकाला काही नागरिक उपचारासाठी घेऊन आले होते. मात्र अगोदरच डॉक्टरांनी स्टाफ नर्सला सांगून कोणत्याही रुग्णास घेण्यास मनाई केली होती. त्यानंतरही रुग्णावर उपचार केले नाही म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी टुटेजा हॉस्पिटलची तोडफोड केली. सदर घडलेला प्रकार अत्यंत दुदैवी आहे, असे डॉ. इंद्रजीतसिंह टुटेजा यांनी म्हटले आहे.
अशा घटना घडू नये, याकरिता नागरिकांनी डॉक्टरच्या मानसिकतेचा विचार करून संयम बाळगावा, असे आवाहन डॉ.टुटेजा यांनी केले आहे. वृत्तपत्रात प्रकाशित बातम्यांमध्ये तोडफोडीच्या घटनेव्यतिरिक्त इतर बाबींचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र दवाखान्यासंदर्भात मांडलेल्या सर्व बाबी चुकीच्या आहेत. आपण गेल्या १२ वर्षांपासून शासन नियमानुसारच रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देत आहे. वैद्यकीय व्यवसायाला लागणारी सर्व कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत, असे डॉ. टुटेजा यांनी म्हटले आहे. भ्
ाावनेच्या भरात रुग्णालयाची तोडफोड करणे योग्य नाही. नातेवाईकांना रुग्णास इतर दवाखान्यात नेण्याचा पर्याय खुला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
वैद्यकीय व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. पीसीपीएनडीटी कायदा हा नर्सिंग होम चालविण्यासाठी लागू होतो. माझ्याकडे केवळ अपघात अथवा हाडासंबंधीच्या आजारांचा उपचार केला जातो. घटनेच्या रात्री मी अस्वस्थ असल्याने औषधी घेऊन आराम करीत होतो. रुग्ण तपासण्याच्या मानसिकतेत मी नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी माझ्या रुग्णालयाच्या मुख्य दाराची तोडफोड केली. अशी घटना होऊ नये, याकरिता रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या मानसिकतेचा देखील विचार करावा.
- डॉ.आय.एन. टुटेजा, संचालक,
टुटेजा हॉस्पिटल, देसाईगंज