४०० रुग्णांची चिकित्सा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:28 PM2019-06-30T21:28:48+5:302019-06-30T21:29:03+5:30
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून आचार्य विनोबा भावे रूग्णालय सावंगी मेघे वर्धा व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त वतीने शनिवारी स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफत हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ४०० पेक्षा अधिक रूग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून आचार्य विनोबा भावे रूग्णालय सावंगी मेघे वर्धा व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त वतीने शनिवारी स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफत हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ४०० पेक्षा अधिक रूग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सतिश खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागदेवते, डॉ. पोद्दार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. अनिल रूडे व डॉ. सतिश खडसे यांनी रूग्णांना हृदयरोगाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. हृदयरोग ग्रस्त रूग्णांनी कोणती काळजी घ्यावी, औषधोपचार कसा घ्यावा, याबाबतची माहिती दिली. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी यांनी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे. अशा शिबिरातून सर्वसामान्य रूग्णांना आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर मिळण्यास सोयीचे होते, असे सांगितले. तपासणीनंतर काही रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शिबिरात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक रूग्णांना शासनाच्या आरोग्य योजनांच्या कार्डाचे वितरण करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी आचार्य विनोबा भावे रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथील आरोग्य कर्मचाºयांनी सहकार्य केले. सदर शिबिरात मधुमेह, बीपी, टुडीईको, इसीजी सह अनेक तपासणीची व्यवस्था पूर्णत: मोफत ठेवण्यात आली होती. तसेच एनजीओग्राफीच्या सेवेसाठी रूग्णांना शुल्कामध्ये ५० टक्के सवलतही देण्यात आली. गडचिरोली तालुक्यासह परिसरातील रूग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
योजनांचा लाभ घ्या
विद्यमान सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अमलात आणली आहे. या योजनेनुसार अनेक गंभीर आजारावर मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.