मेडिगड्डा प्रकल्पाने शेकडो एकर शेतजमीन बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 05:00 AM2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:39+5:30
मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीगड्डा बॅरेजला तेलंगणा सरकारने मंजुरी प्रदान केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर मेडीगड्डा प्रकल्प साकारला. या बॅरेजमुळे तेलंगणातील शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातील आरडा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेकडो एकर शेतजमिनीवरील पिके पाण्याखाली बुडाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.
मेडीगड्डा बॅरेज होऊ नये, यासाठी सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागात विविध राजकीय पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुळीच विचार केला नाही. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून मेडीगड्डा बॅरेजला तेलंगणा सरकारने मंजुरी प्रदान केली. गतीने या बॅरेजचे कामही पूर्ण करण्यात आले. या बॅरेजचा फायदा तेलंगणातील शेतकऱ्यांना झाला. मात्र हा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील शेतकºयांच्या मुळावर उठल्याचे आता दिसून येत आहे. सद्य:स्थिती सिरोंचा तालुक्याच्या आरडा परिसरातील रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांमध्ये अतोनात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची झोप पूर्णत: उडाली आहे.
सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आरडा परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पदाधिकाºयांसह आरडा गावातील नागरिक रंगू किष्टय्या, येठला मल्लाना, पसूला नागेश, रंगू कमलाकर, पंतगी राजेश, ताल्लपली सदानंदम, रंगू रामप्रसाद, मारगोनी सत्यनारायण, रंगू राजू, रंगू सांभया, पसूला किष्टस्वामी, रवींद्र रंगू, येमुला राजू, नरेंद्र रंगू, मुरली रंगू, दामोदर रंगू, श्रीनिवास रंगू, रंगू मल्लया, रंगू लच्छना आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आरडा परिसरातील शेतकºयांनी कर्ज काढून आपली शेती विकसीत केली. मात्र मेडीगड्डा प्रकल्पामुळे मिरची, कापूस तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
भाजीपाला पिकांसह मत्स्य व्यवसायालाही फटका
मेडीगड्डा बॅरेजच्या अतोनात पाण्यामुळे भाजीपाला पिकांसह मत्स्य व्यवसायालाही जोरदार फटका बसला आहे. आरडा गावातील शेतकरी कापूस पिकासह मिरची, कोबी व इतर प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड करीत असतात. यंदाही या पिकाची लागवड झाली होती. मात्र बॅरेजच्या पाण्यामुळे फटका बसला. मत्स्यबिज वाहून गेल्याने मत्स्य व्यवसायालाही फटका बसला.
जलप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
मेडीगड्डा बॅरेजमुळे सिरोंचा तालुक्याच्या आरडा गावातील व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोलुरी, शहर अध्यक्ष विजय रंगुवार, नगर पंचायतचे स्वच्छता व आरोग्य सभापती सतिश भोगे, नगरसेवक विजय तोकला यांनी केली असून या संदर्भात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन दिले आहे.