मेडिगड्डा धरणाचा सिरोंचालाही लाभ
By admin | Published: May 9, 2016 01:30 AM2016-05-09T01:30:26+5:302016-05-09T01:30:26+5:30
गोदावरी नदीवरील मेडिगड्डा धरणाचे पाणी ५० किमीच्या अंतरावर साचणार आहे. याचा लाभ सिरोंचा तालुक्यातील गावांनाही होणार आहे.
खासदारांची माहिती : केंद्राकडे करणार तेलंगणाची तक्रार
गडचिरोली : गोदावरी नदीवरील मेडिगड्डा धरणाचे पाणी ५० किमीच्या अंतरावर साचणार आहे. याचा लाभ सिरोंचा तालुक्यातील गावांनाही होणार आहे. महाराष्ट्र शासनाला माहित न करताच तेलंगण सरकारने भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. याबाबतची तक्रार केंद्र शासनाकडे केली जाईल, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान रविवारी दिली.
मेडिगड्डा धरण जवळपास १०० मीटर उंच राहणार आहे. नदी पात्रात व सभोवतालच्या परिसरात वर्षभर पाणी राहणार असल्याने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका समोर ठेवून विरोधक धरणाच्या आड राजकारण करीत आहेत. गोदावरी नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा हक्क आहे. त्यामुळे भूमिपूजनाचा सोहळा आटोपण्यापूर्वी तेलंगण सरकारने राज्य शासनाची परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र तेलंगणाने राज्य शासनाची परवानगी घेतली नाही. याबाबतची तक्रार राज्य शासन केंद्राकडे करणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, अनिल पोहणकर, अविनाश महाजन, सुधाकर येनगंधलवार, रमेश भुरसे, प्रशांत भृगुवार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)