लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रश्नावर १९ ला बैठक

By admin | Published: June 12, 2014 12:05 AM2014-06-12T00:05:55+5:302014-06-12T00:05:55+5:30

नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्याबरोबरच वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गासंदर्भात असलेल्या अडचणी दूर करण्यात याव्या, या मागणीसाठी विदर्भातील भाजपाचे खासदार एकवटले

Meeting on the railway issue in Lok Sabha area on 19th | लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रश्नावर १९ ला बैठक

लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रश्नावर १९ ला बैठक

Next

गडचिरोली : नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्याबरोबरच वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गासंदर्भात असलेल्या अडचणी दूर करण्यात याव्या, या मागणीसाठी विदर्भातील भाजपाचे खासदार एकवटले असून या खासदारांनी नुकतीच रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची दिल्ली येथे भेट घेतली व विदर्भातील प्रलंबित रेल्वे प्रश्न तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी केली.
वडसा-गडचिरोली या प्रलंबित रेल्वे मार्ग व नागभीड-नागपूर रेल्वे मार्गाबाबत चर्चा करण्यासाठी नागभीड येथे १९ जूनला दुपारी १२ वाजता नागपूर व बिलासपूर रेल्वे झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत रेल्वे मार्गाबाबत नागरिकांनी मुद्दे मांडावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.
नागभीड-नागपूर या ब्राडगेज रेल्वे मार्गाला संपुआ २ सरकारच्या काळातच केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या रेल्वे मार्गासाठी ५० टक्के निधीचा वाटा देण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्यमंत्री मंडळानेही मंजुरी दिली होती. परंतु हे काम संपुआ सरकारने तातडीने मार्गी लावले नाही. त्यामुळे आता भाजपाच्या खासदारांनी या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे. तसेच मागील ३०-४० वर्षापासून रखडलेल्या वडसा-गडचिरोली या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षण कामालाही मंजुरी देण्यात आली होती.
तत्कालिन रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण काम पूर्ण करून निविदा प्रक्रियेसाठी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारला ५० टक्के वाटा द्यावयाचा आहे. ५० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे. परंतु हे सर्व काम प्रलंबित आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचार करतांना या भागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यानंतर आता दिल्ली येथील संसदेच्या अधिवेशनादरम्यान केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते, खा. हंसराज अहीर, खा. नाना पटोले, खा. रामदास तडस आदींनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढा, अशी मागणी केली आहे. चंद्रपूर येथून मुंंबईसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणीही हंसराज अहीर यांनी यावेळी केली आहे यावेळी सदानंद गौडा यांनी विदर्भातील रेल्वेशी संबंधित सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Meeting on the railway issue in Lok Sabha area on 19th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.