अंत्योदय कार्डावरील सदस्य प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यात वर्ग होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:01:16+5:30
केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी अन्न योजनेपैैकी अंत्योदय योजना ही महत्त्वाची योजना आहे. ज्या नागरिकांना कोणतेही काम करणे जमत नाही, अथवा पीडित आहेत, तसेच अती गरीब कुटुंब याशिवाय पीडित व्यक्ती, अंध, अपंग व्यक्ती, विधवा महिला यांच्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची ही योजना आहे.
विलास चिलबुले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेवरील सदस्य प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये वर्ग करण्याच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू झाल्या असून या संदर्भातील कार्यवाही प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक राशनकार्डधारकांकडून अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या व एका कार्डावर एक किंवा दोन व्यक्ती असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा लहान कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्याऐवजी प्रती व्यक्ती ५ किलोनुसार धान्य मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी अन्न योजनेपैैकी अंत्योदय योजना ही महत्त्वाची योजना आहे. ज्या नागरिकांना कोणतेही काम करणे जमत नाही, अथवा पीडित आहेत, तसेच अती गरीब कुटुंब याशिवाय पीडित व्यक्ती, अंध, अपंग व्यक्ती, विधवा महिला यांच्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची ही योजना आहे. या योजनेत समाविष्ट असलेले व कार्डावर एक ते दोनच व्यक्तींचा नाव असलेले गडचिरोली जिल्ह्यात ३१ हजार लाभार्थी असून संपूर्ण महाराष्टÑात ८१ हजार ८९७ इतके लाभार्थी आहेत. आता सरकारने सदर अंत्योदय योजनेचे नवे नामकरण केले आहे. पंडित दीनदयाल अंत्योदय योजना अशी नवी योजना म्हणून ओळखली जात आहे. मात्र या योजनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. एक किंवा दोन व्यक्ती असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वर्ग करून प्राधान्य लाभार्थी कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याने अशा कुटुंबावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यभरात अंत्योदय अन्न योजनेत एकूण २४ लाख ५५ हजार ९१४ लाभार्थी आहेत. यात एक व दोन व्यक्तींचा समावेश असलेल्या राशनकार्डधारकांची ६ लाख ८१ हजार ८९७ इतकी आहे. अल्प सदस्य संख्या असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब योजनेत वर्ग करण्यात येणार आहे.
एक किंवा दोन व्यक्ती हे अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. यामध्ये अंध, अपंग, विधवा महिला, दीर्घ आजारी व्यक्ती, पीडित व्यक्ती, अत्यंत गरीब व्यक्ती, निराधार, एचआयव्हीग्रस्त व्यक्ती, वयोवृद्ध, पती-पत्नी आदींचा समावेश आहे. मात्र शासन आता अशा व्यक्तींना अंत्योदय योजनेतून प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करणार आहे. त्यामुळे त्यांची मोठी अडचण होणार आहे. त्याअनुषंगाने पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून एक व दोन व्यक्ती असलेल्या लाभार्थ्यांची नावानिशी यादी मागविली आहे. वर्ग करण्याची ही प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी जिल्ह्यात होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून दुष्काळी परिस्थितीत स्वस्त धान्यावर मदार असते.
महिनाभराचा प्रपंच कसा होणार?
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल व मागास जिल्हा आहे. केंद्र सरकारच्या सदर अंत्योदय योजनेच्या बदलाचा फटका गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ३१ हजार २६ लाभार्थ्यांना बसणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे एकूण २ लाख १८ हजार ५३७ लाभार्थी आहेत. यामध्ये एक व दोन व्यक्तींचा समावेश असलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या ३१ हजार २६ आहे. या कुटुंबांना अंत्योदय योजनेतून प्रत्येकी ३५ किलो धान्य मिळत आहे. मात्र प्राधान्य कुटुंबात समाविष्ट झाल्यानंतर या राशनकार्डधारकांना प्रती व्यक्ती पाच किलोनुसार धान्य मिळणार आहे. यामध्ये एका व्यक्तीला तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू मिळणार आहे. १० किलो धान्यामध्ये संपूर्ण महिनाभराचा प्रपंच कसा चालवायचा, असा सवाल या अंत्योदय योजनेतील कार्डधारक करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्याला या फेरबदलाच्या निर्णयातून वगळण्यात यावे, अशी मागणी होत आहे. विद्यमान सरकारच्या काळात अनेक योजनांच्या अंमलबजावणी फेरबदल करण्यात येत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.