नक्षल्यांकडून हत्या झालेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:31 AM2017-11-23T00:31:59+5:302017-11-23T00:32:37+5:30
नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या नागरिकाच्या सन्मानार्थ स्मारक उभारून अहेरी तालुक्यातील येलचिल पोलीस मदत केंद्राने नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या नागरिकाच्या सन्मानार्थ स्मारक उभारून अहेरी तालुक्यातील येलचिल पोलीस मदत केंद्राने नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. मृत नागरिकाच्या पत्नीच्याच हस्ते त्याचे पूजनही करण्यात आले.
येलचिल पोलीस मदत केंद्रातर्फेआदिवासी नागरिकांसाठी विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २००९ मध्ये नक्षल्यांनी हत्या केलेल्या कल्लेम येथील रैनु गुम्मा आत्राम यांच्या सन्मानार्थ गावातच स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाची पुजा मृतकाची पत्नी व मुलांच्या हस्ते करण्यात आली. यावर्षी नक्षल सप्ताहाला नागरिकांनी थारा न देता नक्षल्यांची स्मारके उद्ध्वस्त केली. त्यांचे बॅनरही जाळले. आता पोलिसांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या व्यक्तीचे स्मारक उभारल्यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होत आहे.
सदर स्मारक अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले. यासाठी उपनिरीक्षक शेळके, राज्य राखीव पोलिस दल तसेच जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी सहकार्य केले.