आरमोरीतील आशावर्कर पदभरतीत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:48 AM2017-10-07T00:48:42+5:302017-10-07T00:48:57+5:30
जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. गडचिरोली अंतर्गत तालुका आरोग्य कार्यालय आरमोरीच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील आशावर्करच्या २१ पदांसाठी मुलाखत घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. गडचिरोली अंतर्गत तालुका आरोग्य कार्यालय आरमोरीच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील आशावर्करच्या २१ पदांसाठी मुलाखत घेण्यात आली. या पदभरतीत पात्र उमेदवार असताना अपात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाला आहे. सदर पदभरतीत घोळ झाल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया घेण्यात यावी, अशी मागणी सिर्सी येथील सुमन मडावी व नरोटी चक येथील पंचफुला उसेंडी व भाग्यशाली म्हशाखेत्री यांनी केली.
यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, आशावर्कर पदासाठी स्थानिक उमेदवार असण्याची जाहिरातीनुसार अट आहे. मात्र पदभरती कमिटीने गावातील रहिवासी नसणाºया तसेच शासकीय आरोग्य सेवेतील कामाचा अनुभव नसणाºया गणेशपूर गावातील महिलेची निवड केली, असे सूमन मडावी यांनी सांगितले. गणेशपूर येथील निवड झालेल्या महिलेला ४५ टक्के गुण असून ती सिर्सी गावाची रहिवासी नाही, तसेच तिच्याजवळ कामाचा अनुभव नाही. माझ्याकडे शैक्षणिक गुणवत्ता, अनुभव असतानाही मला डावलण्यात आले, असे सूमन मडावी यांनी सांगितले. विधवा महिलाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे अटी व शर्तीत नमूद असतानाही शासनाच्या निर्णयाला या पदभरतीत केराची टोपली दाखविण्यात आली. विहिरगाव येथील विधवा महिलेला या भरतीत प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे भरतीप्रक्रियेची चौैकशी करावी, असे उसेंडी म्हणाल्या.