ध्यानातून मानसिक स्वास्थ्य लाभते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:59 AM2018-03-04T00:59:55+5:302018-03-04T00:59:55+5:30
ध्यान केल्यामुळे माणसाला शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते. शिवाय जीवनात आनंद व शांतीचा अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येकाने ध्यान व प्रार्थना नियमितपणे करून आपले जीवन निरोगी करावे,......
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : ध्यान केल्यामुळे माणसाला शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते. शिवाय जीवनात आनंद व शांतीचा अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येकाने ध्यान व प्रार्थना नियमितपणे करून आपले जीवन निरोगी करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.
श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून रेडीगोडाऊन जवळील साई मंदिराच्या प्रांगणात तीन दिवशीय नि:शुल्क सहज ध्यान साधना शिबिर हार्टफुलनेस तर्फे नुकतेच पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. भुसारी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर आकोजवार, प्रशिक्षक प्राचार्य लता पार्लेवार, उमेश पटेल, कार्यक्रमाचे आयोजक चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे, शंकर मुस्कुटे, विनायक उईके आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुधीर आकोजवार म्हणाले, धकाधकीच्या जीवन पध्दतीमुळे मानवी जीवन बदलत चालले आहे. पर्यावरण व निसर्गाच्या असंतुलामुळे माणसाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थावर दुष्परिणाम झाले आहे. हे दुष्परिणाम नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने नियमित ध्यान करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारचे शिबिर होणे गरजेचे आहे, असे सांगितले.
प्राचार्य लता पार्लेवार व उमेश पटेल यांनी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रास्ताविक चंद्रशेखर भडांगे यांनी केले तर संचालन व आभार प्रकाश ताकसांडे यांनी मानले. सदर शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला.