आलापल्लीचे मतिमंद विद्यालय हलविले आष्टीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:29 PM2017-11-27T23:29:09+5:302017-11-27T23:29:28+5:30
प्रभू विश्वकर्मा ग्रामीण बहुउद्देशिय शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित आलापल्ली येथील चाणक्य निवासी मतीमंद विद्यालय हे शासनाची कोणतीही परवानगी घेता चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
अहेरी : प्रभू विश्वकर्मा ग्रामीण बहुउद्देशिय शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित आलापल्ली येथील चाणक्य निवासी मतीमंद विद्यालय हे शासनाची कोणतीही परवानगी घेता चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. शासन तसेच संबंधित विभागाकडे कुठलाही प्रस्ताव सादर न करता संबंधित संस्थेने या शाळेचे स्थानांतरण करून शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सर्वांना शिक्षण मिळावे, तसेच कुणीही शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहता कामा नये, म्हणून शासनातर्फे समावेशित शिक्षणावर कोठ्यवधी रूपयांचा निधी महाराष्टÑात खर्च केला जातो. खासगी शिक्षण संस्थांना अशा प्रकारची शाळा चालविण्यासाठी मान्यता देताना स्वतंत्र व सर्व सोयीसुविधायुक्त इमारत तसेच इतर अटी व शर्ती घातल्या जातात. मात्र याला आलापल्लीचे चाणक्य मतीमंद विद्यालय अपवाद ठरले आहे. सदर संस्थेला २००६ मध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे मतीमंद विद्यालय सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. काही वर्षी ही शाळा आलापल्लीत भाड्याच्या इमारतीत सुरू होती. त्यानंतर मागील दीड वर्षापूर्वी ही शाळा लगतच्या आलापल्ली येथे नेण्यात आली. आता हेच विद्यालय मागील दोन वर्षांपूर्वी शासनाची कोणतीही परवानगी न घेता आलापल्लीपासून ४० ते ५० किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थानांतरित करण्यात आली आहे. आलापल्ली हे सर्वांसाठी मध्यर्ती ठिकाण होते. आठवड्या बाजाराला आलेले पालक आपल्या पाल्यांना भेटत होते. पण आता आष्टी येथे ही शाळा गेल्याने अहेरी उपविभागातील पालकांची मोठी पंचाईत झाली आहे. गरीब पालकांना पदरचे पैसे खर्च करून लांब अंतरावर आष्टी येथे जायला परवडत नाही. सदर मतीमंद विद्यालयात अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी आदी पाच तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
प्रस्तुत प्रतिनिधीने १८ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष शाळेत जाऊन शाळा प्रमुखाशी चर्चा केली असता, शाळा स्थानांतरित करणे हा विषय संस्थेचा आहे. आलापल्ली परिसरात योग्य इमारत उपलब्ध होत नसल्याने सदर शाळा आष्टी येथे स्थानांतरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने शाळा आलापल्ली येथे चालविण्यासाठी मान्यता दिली असताना संस्थाचालकाने शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, अर्धे शैक्षणिक सत्र संपल्यावर ही शाळा लांब अंतरावर स्थानांतरित केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व कर्मचाºयांना त्रास सहन करावा लागत आहे.
१० वर्षांत स्वतंत्र इमारत नाही
वर्धा येथील शिक्षण संस्थेमार्फत आलापल्ली येथे मागील १० वर्षांपासून चाणक्य मतीमंद विद्यालय चालविले जात आहे. संबंधित संस्थेने गेल्या १० वर्षात आलापल्ली येथे विद्यालयासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत उभारली नाही. आता इमारत मिळत नसल्याची बाब पुढे करीत ही शाळा आपल्या मनमर्जीने आष्टी येथे स्थानांतरित केली आहे. नियमबाह्यरित्या सदर शाळा स्थानांतरित करणाºया संस्थेवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकवर्गाने केली आहे. ही शाळा पूर्ववत आलापल्ली येथे आणण्यात यावी, असेही पालकांनी म्हटले आहे.
शासनाची पूर्वपरवानगी असल्याशिवाय कोणतीही शाळा स्थलांतरित करता येऊ शकत नाही. जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून व याबाबतची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- नितीन ढगे, आयुक्त समाजकल्याण पूणे
शाळा स्थानांतरणाबाबत जिल्हा कार्यालयाला कोणतीही माहिती प्राप्त नाही. याबाबतचा कोणताही प्रस्ताव कार्यालयाकडे सादर केला नाही. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही शाळा स्थलांतरित करता येत नाही. नियमानुसार कारवाई केली जाईल.
- सुरेश पेंदाम, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, गडचिरोली