पारा प्रचंड वाढला, आरोग्य सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:52 AM2018-04-29T00:52:22+5:302018-04-29T00:52:22+5:30
गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आ हे. जिल्ह्यात उष्णतामानाचा पारा सध्या ४३ अंशावर पोहोचला आहे. उष्माघातासारखा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्ष राहावे, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आ हे. जिल्ह्यात उष्णतामानाचा पारा सध्या ४३ अंशावर पोहोचला आहे. उष्माघातासारखा प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक दक्ष राहावे, तसेच पारा वर चढत असल्याने सध्यातरी घराबाहेर निघताना आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, अशा सल्ला आरोग्य प्रशासन व तज्ज्ञांकडून दिला जात आहे. एप्रिल महिन्यात सुरुवातीला काही दिवस उष्णतामानाचा पारा वर चढला होता. परंतु त्यानंतर झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे काही काळाकरिता वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा सूर्याने आपले रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऐरवी नेहमी गर्दी राहणारे अनेक रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य दिसून येतात. तसेच भर उन्हात घराबाहेर पडणारे अनेक लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी फायदेशिर ठरणारे लिंबूसरबत, मठ्ठा, उसाचा रस, लस्सी सेवन करताना दिसून येत आहेत. एकूणच वाढत्या उन्हामुळे जनजीवन काही प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.
दुपारी घराबाहेर निघू नका
वाढत्या उन्हामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर निघण्याचे टाळले पाहिजे. विशेष करून लहान मुलांना प्रवासासाठी उन्हात नेऊ नये. सकाळी तसेच सायंकाळच्या सुमारास प्रवास करावा. जेणे करून उन्हापासून बचाव होईल.
पुरेसे पाणी प्यावे
भर उन्हात घराबाहेर पडणाऱ्यांसह इतरांनीही उन्हाळ्याच्या दिवसात जास्त घाम येत असल्याने तहाण लागली नाही तरी पुरेसे पाणी पिले पाहिजे. दिवसभर गेलेल्या घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते. त्यामुळे वाढत्या उष्णतामानात पुरेसे पाणी पिणे फायदेशिर ठरते.
पाणपोईची संख्या अल्प
जीवाची काहीली करणाºया प्रत्येक वाटसरूला उन्हापासून दिलासा मिळून पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत काही संघटनांतर्फे पाणपोई विविध ठिकाणी लावल्या जाते. मात्र यंदा पाणपोईची संख्या जिल्ह्यात अल्प दिसून येत आहे.
जनावरांना सावलीत ठेवा
उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी पिण्याकरिता द्यावे, अशक्त व कमजोरीसारखे जाणवत असल्यास तत्काळ पशु वैदयकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
अशाप्रकारे घर थंड ठेवावे
उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करताना नागरिकांनी पिण्याचे पाणी सोबत घ्यावे, तसेच आपले घर कसे थंड ठेवता येईल, यासाठीही प्रयत्न करावे.
घराला पडदे, झडपा, सनशेड बसवावे, रात्रीच्या सुमारास खिडक्या उघड्या ठेवाव्यात, उन्हाचा तडाखा जाणवल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी. शिवाय फॅन व कुलरचा वापर करावा. अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन औषधोपचार घ्यावा.
सौम्य रंगाचे सुती कपडे परिधान करावे
उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी सौम्य रंगाचे तसेच सैल व कॉटनचे कपडे परिधान केले पाहिजे. घराबाहेर पडताना बाहेर गॉगल, छत्री, टोपी, बुट तसेच चप्पल वापरावे. पांढरा दुपट्टा डोक्याला बांधणे गरजेचे आहे. यामुळे नागरिकांचा वाढत्या उन्हापासून बचाव होत असतो.
अनेक नागरिकांना ऋतुमानानुसार कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे, याबाबत पाहिजे त्या प्रमाणात माहिती नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उन्हाळ्याच्या दिवसात सौम्य रंगाचे सैल व सुती कपडे वापरणे फायदेशिर ठरते. लहान मुला-मुलींनाही उन्हाळ्यात कपडे घालून देताना काळजी घेतली पाहिजे.