मुलचेराच्या मुख्याधिकाऱ्यांना निरोप
By admin | Published: December 31, 2016 02:34 AM2016-12-31T02:34:08+5:302016-12-31T02:34:08+5:30
नगर पंचायत मुलचेरा येथे मुख्याधिकारी व नायब तहसीलदार समशेर पठाण यांना निरोप देण्यात आला.
नवीन मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत : न. पं. पदाधिकारी उपस्थित
मुलचेरा : नगर पंचायत मुलचेरा येथे मुख्याधिकारी व नायब तहसीलदार समशेर पठाण यांना निरोप देण्यात आला. तसेच नव्याने पदभार स्वीकारणारे मुख्याधिकारी डॉ. किरण पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
२०१५ मध्ये मुलचेरा येथे नगर पंचायतची निर्मिती करण्यात आली. नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार येथील तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार समशेर पठाण यांच्याकडे देण्यात आला होता. २०१५ पासून समशेर पठाण यांनी नायब तहसीलदार पद सांभाळत येथील नगर पंचायतचे मुख्याधिकारी पद सुद्धा यशस्वीरित्या सांभाळले. २६ डिसेंबरला नगर पंचायतमध्ये नियमित मुख्याधिकारी म्हणून डॉ. किरण पाटील रुजू झाल्याने समशेर पठाण यांनी आपला कार्यभार त्यांच्याकडे सोपविला. नगर पंचायतकडून मुख्याधिकारी पठाण यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला व नवनियुक्त मुख्याधिकारी डॉ. पाटील यांचे स्वागत पुष्पगुच्छाने करण्यात आले.
यावेळी नगर पंचायतचे अध्यक्ष सुभाष आत्राम, उपाध्यक्ष देवा चौधरी, बांधकाम सभापती दीपक परचाके, पाणी पुरवठा सभापती अल्का मेहर, महिला व बाल कल्याण सभापती जास्वंदा गोंगले, विरोधी पक्ष नेते दिलीप आत्राम, सुनीता कुसनाके, वनीता आलाम, विकास मडावी, उमेश पेडुरकर, प्रमोद गुट्टेवार, गोपिका चौधरी, कविता मडावी यांच्यासह सर्व नगर सेवक व मुलचेरा येथील नागरिक उपस्थित होते.