रस्त्याच्या दुरवस्थेने बस गेली खड्ड्यात

By admin | Published: July 13, 2017 01:49 AM2017-07-13T01:49:55+5:302017-07-13T01:49:55+5:30

अहेरी उपविभागातील मुलचेरा तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

In the middle of the road, the bus crashed into the ditch | रस्त्याच्या दुरवस्थेने बस गेली खड्ड्यात

रस्त्याच्या दुरवस्थेने बस गेली खड्ड्यात

Next

सुदैवाने जिवितहानी टळली : मथुरानगरच्या नाल्याजवळील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
गोमणी : अहेरी उपविभागातील मुलचेरा तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्तरावरील यंत्रणेचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गोमणी परिसरातील मथुरानगरनजीकच्या नाल्यालगत अरूंद रस्ता असल्याने राज्य परिवहन महामंडळाची बस खड्ड्यात गेली. मात्र सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी घडली नाही. सदर घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रपूर-गोमणी-मुलचेरा-गोविंदपूर ही एमएच-४०-एन-९९९३ क्रमांकाची बस गोविंदपूरवरून मुलचेरा मार्गे चंद्रपूरला प्रवाशी घेऊन निघाली. मथुरानगरजवळ नाल्यावरील पुलाच्या काही अंतरावर पावसामुळे रस्ता पूर्णत: खचला असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्याच्या जवळ बस येताच सदर बसचा एक चाक खड्ड्यात गेला व बसचा तोल संपूर्ण एका बाजूने झाला. बसचालकाने सतर्कत: दाखविल्यामुळे बस उलटली नाही. सदर बसमध्ये ५० ते ६० प्रवाशी बसले होते. यामध्ये ३० ते ३५ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश होता. बस पुलाच्या काही अंतरावर येताच अर्धा रस्ता खचून गेला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणत्याही प्रवाशाला नुकसान पोहोचले नाही.
सदर बसमधील काही प्रवाशांनी या घटनेची माहिती देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराला दूरध्वनी क्रमांकावर फोन केला. मात्र फोनला प्रतिसाद मिळाला नाही, असे बसमधील प्रवाशांनी सांगितले. त्यानंतर या बसच्या चालकाने थेट अहेरी आगार गाठले.
मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागाच्या अनेक दुर्गम गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था बकाल आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होत असल्याने महामंडळाच्या बसेस अनेकदा खड्ड्यात फसल्या आहेत. त्यामुळे महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनाही प्रचंड त्रास होत असतो. नागरिकांकडून वारंवार मागणी होऊनही प्रशासनाने ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची पक्की दुरूस्ती अद्यापही केली नाही. बस खड्ड्यात अडकणे, रस्त्यांच्या दुरवस्थेने बसला किरकोळ अपघात होणे व इतर घटनांमुळे राज्य परिवहन महामंडळाला लाखो रूपयांचे नुकसान सहन करावा लागत आहे.

Web Title: In the middle of the road, the bus crashed into the ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.