प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:14 AM2018-06-17T01:14:04+5:302018-06-17T01:14:04+5:30
प्रवाशांच्या सोईसाठी अनेक बसथांब्यावर प्रवासी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एकदा बांधकाम केल्यानंतर त्या प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची जीर्ण व दुरवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : प्रवाशांच्या सोईसाठी अनेक बसथांब्यावर प्रवासी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एकदा बांधकाम केल्यानंतर त्या प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची जीर्ण व दुरवस्था झाली आहे.
तालुक्यातील कुरूड फाट्यावरील प्रवासी निवारा पूर्णपणे जीर्ण झाला असून छतावरील सिमेंट पत्र्यांना मोठे भगदाड पडले आहे. ऊन, वारा, पाऊस आणि थंडी यापासून प्रवाशांचे रक्षण व्हावे, यासाठी शासनाने हजारो रूपये खर्च करून गावोगावी प्रवासी निवारे बांधले. परंतु त्याच्या देखभालीची तरतूद केली नसल्याने बऱ्याच ठिकाणी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. कुरूड फाट्यावरील प्रवासी निवाऱ्याची अवस्था अतिशय बिकट असून पावसाळ्यात तो कधीही कोसळू शकतो. प्रवासी निवाऱ्याच्या छतावरील सिमेंट पत्रे पूर्णत: फुटले असल्याने येथे प्रवासी विश्रांती घेऊ शकत नाही. त्याचबरोबर पाठीमागील भिंत खालून पोखरलेली आहे. ती कधी कोसळेल, याचा नेम नाही. काही दिवसातच शाळा, महाविद्यालय सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ प्रवाशीच नाही तर विद्यार्थी सुद्धा शिक्षणासाठी ये-जा करताना प्रवासी निवाऱ्याचा आधार घेतात. परंतु देसाईगंज-आरमोरी, देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील अनेक प्रवासी निवाऱ्यांचीच दुरवस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात कुठे आसरा घ्यावा, असा प्रश्न पडता आहे.
संबंधित विभागाने किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रवासी निवाऱ्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरवर्षीच ही मागणी केली जाते. परंतु काहीच उपयोग होत नसल्याने रोष आहे.