गडचिरोली: अहेरी परिसरातील अनेक गावांत भूकंपाचे सौम्य धक्के; ४.३ तीव्रतेच्या धक्क्याची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 09:26 PM2021-10-31T21:26:10+5:302021-10-31T21:26:44+5:30
गडचिरोलीमधील अहेरी परिसरातील अनेक गावांमध्ये सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
गडचिरोली:गडचिरोलीमधील अहेरी परिसरातील अनेक गावांमध्ये सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचे केंद्र अहेरी ते सिरोंचादरम्यान असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफ्राबाद चकजवळ (प्राणहिता नदीजवळ), सिरोंचा तालुका-अक्षांश आणि रेखांशानुसार केंद्राची नोंद आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. कृपया कोणतीही दहशत आणि भीती निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत. आत्तापर्यंत कोणतीही मानवी किंवा मालाची हानी झाल्याचे वृत्त नाही. संबंधित विभागांकडून माहिती प्राप्त होताच अधिकृत अहवाल दिला जाईल, असे मीणा यांनी यावेळी सांगितले. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्राणहिता नदीच्या केंद्रबिंदूपासून ७७ किलोमीटर खोलीसह ४.३ रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने केली आहे. अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदपूर, आष्टी, बोरी, राजाराम खांदला या गावापर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले.