देसाईगंजच्या राईस मिलमध्ये भरडाई केलेला तांदूळ गोठविला, कारण काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 05:36 PM2022-10-22T17:36:40+5:302022-10-22T17:49:39+5:30
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे निर्देश,
गडचिरोली : निकृष्ट तांदूळ पुरवठा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या देसाईगंज येथील मे. जेजानी राईस मिलची उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर भरडाई झालेला तांदूळ गोदामात जमा करू नये किंवा इतर मार्गाने त्याची विल्हेवाट लावू नये, असे निर्देश देत तो तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गुरुवारी गोठविला आहे.
सदर मिलमध्ये दि. १७ ला करण्यात आलेल्या तपासणीत मिलमध्ये मे. जेजानी राईस मिल आणि मे. देवीकमल राईस मिल यांचा तांदूळ होता. त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. संबंधित प्रयोगशाळेकडून त्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या तांदळाची कुठल्याची पद्धतीने विल्हेवाट लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसला बगल
मे. जेजानी राईस मिलकडून जिल्ह्यातील वडसा, चामोर्शी, अहेरी, आरमोरी आणि कुरखेडा येथे वेळोवेळी निकृष्ट दर्जाचा सीएमआर पाठविल्याची तक्रार आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मे.जेजानी राईस मिलला नोटीस बजावून दि.१७ ऑक्टोबर रोजी स्वत: हजर राहून लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. परंतु गोंदियात डॉक्टरकडे अपॉईटमेंट असल्याचे सांगत त्या दिवशी राईस मिलचे संचालक हजर झाले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा दि. २१ ला हजर होण्यास सांगितले. परंतु यावेळीही ते हजर झाले नाही.
सविस्तर तपशील मागविला
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जेजानी मिलच्या नावे अभिकर्ता संस्थेकडून मंजूर धानाचे डीओ, त्यानुसार धान उचल केल्याच्या दिनांकासह तपशील, जमा केलेला सीएमआर, जमा करावयास शिल्लक सीएमआर, मिलमध्ये शिल्लक धान, भरडाईस सुरूवात केल्यापासून वापरत असलेले वीज युनिट, मिलमध्ये शासकीय धान सोबत खासगी धानाची भरडाई होते काय? असल्याचा तपशील, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कार्यालयाकडून निर्गमित लायसन्स इत्यादी बाबींची माहिती लेखी दस्तावेजासह सादर करण्यास सांगितले आहे.
जेजानी राईस मिलला दोन वेळा नोटीस बजावली. पण ते जिल्हाधिकाऱ्यांपुढे हजर झाले नाही. त्यामुळे या प्रकरणी कोणती कारवाई करायची याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारीच घेतील.
- दर्शन निकाळजे, जिल्हा पुरवठा अधिकारी