आहार पुरवठ्यात लाखोंचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:45 AM2018-02-17T00:45:00+5:302018-02-17T00:45:45+5:30
जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्ह्यात शालेय पोषण आहारात सध्या महिन्याकाठी लाखो रुपयांचा अपहार होत असून त्यात संबंधित यंत्रणा आणि आहार पुरवठादार यांची साठगाठ असल्याचा आरोप ज्येष्ठ जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम यांनी पत्रपरिषदेत केला.
शालेय पोषण आहाराचा कंत्राट जानेवारी महिन्यात कन्झुमर फेडरेशन मुंबईला मिळाला, मात्र प्रत्यक्षात त्यांनी आहार पुरवठ्याची जबाबदारी दुसऱ्यांलाच दिली आहे. त्यामुळे तांदूळ पुरवठ्यात कमी वजनाच्या बॅग शाळांना पुरविल्या जात आहेत. यासंदर्भातील तक्रारी आल्यानंतर स्वत: काही शाळांना भेटी देऊन तेथील पोषण आहाराच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असताना ते निर्धारित वजनापेक्षा कमी आढळल्याचे अॅड.मेश्राम यांनी सांगितले.
दि.९ फेब्रुवारीला हिरापूर येथील उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. त्या ठिकाणी २ फेब्रुवारीला पोषण आहारातील तांदळाच्या कट्ट्यांचा पुरवठा झाला होता. त्यातील न वापरलेल्या तांदळाच्या सीलबंद कट्ट्यांचे वजन केले असता प्रत्येक कट्ट्यात दिड ते दोन किलो तांदूळ कमी आढळून आला. यावेळी हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार, मुख्याध्यापक बी.एन.नवघडे व इतर लोकांसमक्ष पंचनामा केल्याचे मेश्राम यांनी सांगितले. त्याचबरोबर दि.१५ ला पोटेगाव येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली असता तिथे ११ तांदळाच्या ५० किलोच्या कट्ट्यांमध्ये प्रत्येकी ५ किलो तांदूळ कमी आढळून आला. याशिवाय खाण्याचे तेल १ लिटरचे देऊन पावती मात्र १ किलोची देण्यात आली. त्यात एका पाकिटात ९० ग्रॅम तेल कमी होते. याशिवाय वटाणा, तूर दाळ यांचेही वजन कमी आढळले असून तिथेही गडचिरोली पं.स.चे उपसभापती विलास दशमुखे, मुख्याध्यापक बगमारे व इतर लोकांसमक्ष पंचनामा करण्यात आला. एफसीआयच्या पोत्यांना मध्येच छिद्र पाडून तांदूळ काढला जातो. केवळ एका तालुक्याला महिन्याला ६६ हजार किलो तांदळाचा पुरवठा होतो. त्यात ६ हजार किलो तांदूळ कमी भरल्या गेला तरी महिन्याकाठी ५० लाखांचा अपहार होत असल्याचे अॅड.मेश्राम म्हणाले.
कृषी महोत्सवाला जि.प.सदस्यांचे वावडे
गडचिरोलीत आयोजित कृषी व गोंडवाना महोत्सवाचे आयोजन आत्मा आणि डीआरडीएकडून केले जात आहे. मात्र जिल्हा परिषदेशी संबंधित विभाग असतानाही जि.प.उपाध्यक्ष, सभापती किंवा सदस्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान दिले नाही. जिल्हा परिषद ही भाजपची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी झाली का? असा सवाल करून याची चौकशी करावी अशी मागणी अॅड.राम मेश्राम यांनी केली.