अर्धवट विहीर बांधकामाने लाखो रूपये पाण्यात
By admin | Published: May 7, 2016 12:17 AM2016-05-07T00:17:37+5:302016-05-07T00:17:37+5:30
राष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा परिषद गडचिरोली व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एटापल्ली तालुक्यातील....
एटापल्ली तालुक्यातील स्थिती : बांडे, झारेवाडा व परसलगोंदी येथील विहिरी ठरल्या आहेत बेकामी
रवी रामगुंडेवार एटापल्ली
राष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा परिषद गडचिरोली व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये विहिरींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र यातील अनेक विहिरींचे बांधकाम अर्धवटच राहिले आहे. तर काही विहिरी तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पध्दतीने बांधल्या आहेत. तर काही विहिरींसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे. त्यामुळे या विहिरी निकामी ठरल्या असून लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे.
ग्रामपंचायत परसलगोंदीत समाविष्ट असलेल्या बांडेगावात तीन वर्षांपूर्वी सहा लाख रूपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. विहिरीची तोंडी उंच करण्यात आली आहे. विहिरीतून पाणी काढतेवेळी सांडलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी विहिरीच्या सभोवताल सिमेंटचा गोलाकार कठडा बनविणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकारचा कठडा बनविण्यात आला नाही. तोंडी उंच असल्यामुळे हातही पूरत नाही. विहिरीच्या सभोवताल प्लास्टरसुध्दा करण्यात आले नाही. पाणी काढता येत नसल्याने सदर विहीर बेकामी झाली आहे.
कसनसूर परिसरातील जवेली खुर्द अंतर्गत पिपली बुर्गी या गावात एमआरईजीएस अंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मजुरांची मजुरी देण्यात आली नाही. या विहिरीचे बांधकाम सुध्दा अर्धवटच राहिले आहे. फक्त मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या विहिरीत सभोवतालचे पाणी साचत असल्याने सदर पाणी आरोग्यास धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तोंडी बांधण्यात आली नसल्याने मुले खेळताना अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामपंचायत तोडसा अंतर्गत झारेवाडा गावात निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे. एक वर्षाच्या कालावधीतच चबुतरा पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या विहिरीचेही बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप झारेवाडा येथील नागरिकांनी केला आहे. एटापल्ली तालुक्यात बारमाही वाहणारी बांडे नदी आहे. तसेच अनेक लहान-मोठे तलाव आहेत. पाण्याची पातळी चांगली असतानाही विहिरींअभावी पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे.