रॉयल्टीपेक्षा जादा मुरूमाचे खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:09+5:30
देविदास हरिराम सहारे यांनी नान्ही येथील शेतकरी भिवाजी सोमाजी उईके यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०/१ मधून २५ ब्रास मुरूमाचे खनन करण्यासाठी कुरखेडा तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी मागितली होती. उपलब्ध दस्तावेजाच्या आधारे देविदास सहारे यांच्या नावे परवाना निर्गमित करून मुरूम खननाची परवानगी देण्यात आली होती. १६ ते २६ मे २०२० या कालावधीत मुरूमाचे खनन या रॉयल्टीच्या आधारे करावयाचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : एकीकडे प्रशासन कोरोनाचा प्रभाव नियंत्रित करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. याच बाबीचा फायदा घेत कुरखेडा तालुक्यातील मुरूम माफियांनी अवैधरित्या मुुरूमाचे खनन केल्याचे २३ मे रोजी तलाठ्याच्या पाहणीत दिसून आले आहे. २५ ब्रासची रॉयल्टी असताना तब्बल ४४२ ब्रास मुरूमाचे अवैधरित्या खनन केल्याचे उघडकीस आले आहे.
देविदास हरिराम सहारे यांनी नान्ही येथील शेतकरी भिवाजी सोमाजी उईके यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०/१ मधून २५ ब्रास मुरूमाचे खनन करण्यासाठी कुरखेडा तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी मागितली होती. उपलब्ध दस्तावेजाच्या आधारे देविदास सहारे यांच्या नावे परवाना निर्गमित करून मुरूम खननाची परवानगी देण्यात आली होती. १६ ते २६ मे २०२० या कालावधीत मुरूमाचे खनन या रॉयल्टीच्या आधारे करावयाचे होते. दरम्यान २३ मे रोजी शनिवारला कुरखेडाच्या तलाठ्यांनी कुरखेडा-वडसा मार्गालगत नवीन प्लॉट व नक्षत्र लॉन येथे मुरूम टाकल्याबाबची चौकशी केली. परवानाधारकास २५ ब्रासची रॉयल्टी असताना तब्बल ४४२ ब्रास मुरूमाचे खनन केल्याचे तलाठ्याच्या लक्षात आले. ज्या भूभागात मुरूम खनन करण्याचा परवाना देण्यात आला होता. त्याच क्षेत्रात खनन न करता या शेतजमिनीस लागून असलेल्या गट क्रमांक ८ व १७३/१ आराजी ०.५० च्या झुडपी जंगल भागातून मुरूमाचे खनन केल्याचे आढळून आले. परवाना काढून गट क्रमांक ८ मधून ९६ ब्रास व गट क्रमांक १७३/१ मधून ३४६ असे एकूण ४४२ ब्रास मुरूमाचे अवैधरित्या खनन केल्याचे मोका पाहणीत तलाठ्यांना दिसून आले. तलाठ्यांनी पंचनामा करून कुरखेडाच्या तहसीलदारांकडे अहवाल सादर केला.
यापूर्वीही येरंडीत झाले होते खनन
कुरखेडा तालुक्यात यापूर्वी येरंडी येथून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात मुरूमाचे खनन करण्यात आल्याचे महसूल विभागाच्या पाहणीत दिसून आले. या प्रकरणी कुरखेडा येथील खुशाल बन्सोड या परवानाधारकावर १० लाखांचा दंड तत्कालीन तहसीलदारांनी ठोठावला होता. या दंडाबाबत खुशाल बन्सोड यांनी कुरखेडाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपिल सादर केली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या अहवालाचे अवलोकन करत सदर दंड कायम ठेवला होता. त्यानंतर बन्सोड याने या प्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे अपिल सादर केली. मात्र या अपिलावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.
नान्ही परिसरात अवैध मुरूम खननाचे प्रकरण उजेडात आले असून कुरखेडाचे तहसीलदार संबंधितांवर कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अवैध मुरूम खनन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाई न झाल्यास खनन करणारे व वाहतूक करणाऱ्यांची हिंमत वाढून हा प्रकार वाढत जाईल. परिणामी शासनाचा महसूल बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही.