'गोंडवाना'च्या दीक्षान्त समारंभात मंत्री आत्राम यांना डावलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:26 PM2024-10-01T15:26:54+5:302024-10-01T15:28:55+5:30
निमंत्रण पत्रिकेत नाव नाही: आदिवासी नेत्यावर अन्याय केल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा व १२ वा दीक्षान्त समारंभ तसेच विद्यापीठाच्या १३ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक कॅबिनेट मंत्री व आदिवासी समूहातील ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांचा नामोल्लेख नाही. आदिवासीबहुल जिल्ह्यात होऊ घातलेल्या कार्यक्रमात आदिवासी समूहातील मंत्र्यांनाच डावलण्याची खेळी नेमकी कोणाची, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
गोंडवाना विद्यापीठात १ ऑक्टोबर रोजी दीक्षान्त समारंभ व विद्यापीठ वर्धापन दिन कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अमरावती येथील संत गाडगेबाब विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते हे उपस्थित राहतील. यावेळी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. पदवी प्रदान करण्यात येणार आहे. मंचावर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची उपस्थिती राहणार आहे.
चंद्रपूर येथील विदर्भ वनवासी कल्याणचे अध्यक्ष डॉ. शरद सालफले यांना जीवनसाधना पुरस्काराने २०२४ सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय विद्यापीठ ਰ संलग्नित महाविद्यालयांच्या विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या तयारीची माहिती ३० सप्टेंबरला प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. कृष्णा कारू, डॉ. संजय डाफ, प्रा. सर्फराज अन्सारी उपस्थित होते.
वार्षिकांक स्पर्धेत 'शिवाजी'ची बाजी
आंतरमहाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेचा (२०२३-२४) निकाल जाहीर झाला. यात राजुरा (जि. चंद्रपूर) येथील शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने अव्वल, कुरखेडातील गोंविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाने द्वितीय, तर आरमोरीतील म. गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. चामोर्शीच्या केवळराम हरडे कॉलेज व चंद्रपूरच्या सरदार पटेल कॉलेजने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले.
१५६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षातील पदव्युत्तर पदवी, पदविका तसेच पीएच. डी. प्राप्त करणारे एकूण १५६ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. त्या सर्वांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
आदिवासी नेत्यांचे विद्यापीठाला वावडे
- मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना यापूर्वी देखील विद्यापीठाने एका कार्यक्रमात डावलले होते. मात्र, नंतर चूक लक्षात आल्यावर निमंत्रण पत्रिका बदलून त्यांचा नामोल्लेख केला होता.
- आता पुन्हा एकदा विद्यापीठाने दीक्षान्त समारंभात त्यांना डावलले आहे. विद्यापीठास आदिवासी नेत्यांचे वावडे कशासाठी, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केला आहे.