बोगस रॉयल्टीच्या भरवशावर गौण खनिजाचा व्यवसाय जोरात
By Admin | Published: November 12, 2014 10:44 PM2014-11-12T22:44:04+5:302014-11-12T22:44:04+5:30
अवैध गौण खनिज उत्खननाबाबत राज्य सरकार विविध निर्णय घेऊन प्रतिबंध घालण्याचे काम करीत असताना देसाईगंज शहरात मात्र बोगस रॉयल्टीचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे.
देसाईगंज : अवैध गौण खनिज उत्खननाबाबत राज्य सरकार विविध निर्णय घेऊन प्रतिबंध घालण्याचे काम करीत असताना देसाईगंज शहरात मात्र बोगस रॉयल्टीचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. गौण खनिज साठवणुकीचा परवानाप्राप्त इसमाच्या नावाने बोगस रॉयल्टी बनवून गौण खनिजाची तस्करी सुरू असल्याचे प्रकरण शहरातील नितीन डेंगानी यांनी उजेडात आणले आहे. याप्रकरणी त्यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कारवाई केली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
शहरातील नितीन डेंगानी यांनी गौण खनिज विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथून रेती वाहतुकीचा परवाना प्राप्त केला. या परवानान्यानुसार त्यांना रॉयल्टी क्र. ४११८४५१ ते ४११८६०० पर्यंतचे तीन बुक व ४३७९९५१ क्रमांकाचे एक बुक असे ट्रॅक्टर वाहतुकीचे तीन व एक ट्रक वाहतुकीचे एक बुक प्रशासनाकडून प्राप्त झाले. यानुसार डेंगानी यांनी रेतीची वाहतूक सुरू होती. रेतीची तस्करी करीत असताना डेंगानी यांनी ट्रक एमएच-४०-वाय-९५१२ नुसार आरबीडब्ल्यू नागपूर यांच्या नावाने ट्रक पकडला. त्याच्याकडे नितीन डेंगानी यांच्या नावाचा पावती क्रमांक ४४८५१३ हा बोगस क्रमांक असलेली पावती सापडली. त्यांनी ती पावती हिसकावून घेतली व डेंगानी यांनी देसाईगंज पोलिसात तक्रार दाखल केली. अशा अनेक बोगस रॉयल्टी पावत्यांच्या भरवशावर रेतीची सर्रास वाहतूक सुरू आहे. गौण खनिजाच्या उत्खननावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. बांधकाम थांबू नये, याकरिता काही नियमता शिथीलता आणून परवानगी देण्यात येत आहे. मात्र तस्करांनी बोगस रॉयल्टीचा वापर करून गौण खनिज उत्खननाचा गोरसधंदा सुरू केला आहे. त्यामुळे देसाईगंज तालुक्यात पोलिसांना आता यादृष्टीने तपास करावा लागणार आहे. यापूर्वीही आरमोरी येथे अशाच प्रकारचे एक प्रकरण उजेडात आले होते. (वार्ताहर)