‘मग्रारोहयो’तील गैरव्यवहार भोवला; तीन ग्रामसेवक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:00 AM2023-04-28T11:00:36+5:302023-04-28T11:01:16+5:30
तांत्रिक सहायकाची सेवासमाप्ती : बीडीओंविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव
गडचिरोली : भामरागड, अहेरी व मूलचेरा या तीन तालुक्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. प्राथमिक चौकशीत तब्बल २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला होता. दरम्यान, २७ एप्रिलला जिल्हा परिषदेचे सीईओ कुमार आशीर्वाद यांनी तीन ग्रामसेवकांना निलंबित केले. तांत्रिक सहायकाची सेवासमाप्ती केली असून, गटविकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भामरागड तालुक्यात जिल्हास्तरावरून केवळ २० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी हाेती; पण गटविकास अधिकाऱ्यांनी ५ कोटी ६१ लाख रुपयांची कामे करून बिले मंजूर केली. मूलचेरा येथे दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर होता, तिथे तीन कोटी ४० लाखांची कामे करून निधीची विल्हेवाट लावल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. अहेरी तालुक्यातही कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा आरोप करून सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये तक्रार केली होती. त्यानंतर जि.प. सीईओ कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) रवींद्र कणसे यांच्या अध्यक्षतेखाली रोहयाेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण यांच्यासह सहासदस्यीय समितीने चौकशी केली.
यात तिन्ही तालुक्यांतील गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, तांत्रिक अधिकारी अशा एकूण २३ जणांवर ठपका ठेवला. दरम्यान, दोषी आढळूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत योगाजी कुडवे यांनी २७ मार्चपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले. विभागीय आयुक्तांकडेही धाव घेतली. अखेर जिल्हा परिषदेचे सीईओ कुमार आशीर्वाद यांनी २७ एप्रिलला कारवाईचे आदेश जारी करून गैरव्यवहार करणाऱ्यांना दणका दिला.
यांच्यावर कारवाईचा बडगा...
भामरागड तालुक्यातील मन्नेराजारामचे ग्रामसेवक विशाल चिडे, बोटनपल्लीचे सुनील जेट्टीवार व अहेरी तालुक्यातील नुमानूचे लोमेश सिडाम यांचे निलंबन करण्यात आले. भामरागड तालुक्यातील मडपेलीचे ग्रामसेवक नंदकिशोर कुमरे, येचलीचे तिरुपती सल्ला, पल्लीचे बादल हेमके, इरकडुम्मेचे दिनेश सराटे यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. भामरागडचे गटविकास अधिकारी स्वप्नील मगदुम यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे. शाखा अभियंता सुलतान आजम यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठविला आहे. तांत्रिक सहायक राकेश गणरपू या कंत्राटी कर्मचाऱ्याची सेवासमाप्ती केली आहे. भामरागड पंचायत समितीचे एक सहायक लेखाधिकारी व एक विस्तार अधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे.
दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली आहे. मूलचेरा व अहेरी येथील तक्रारीच्या अनुषंगाने तांत्रिक बाबींची पूरक चौकशी बाकी आहे. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून अहवाल येताच दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- कुमार आशीर्वाद, सीईओ जि.प. गडचिरोली