खुल्या जागांची दैनावस्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:10+5:302021-06-16T04:48:10+5:30

गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र, काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. ...

The misery of open space remains | खुल्या जागांची दैनावस्था कायम

खुल्या जागांची दैनावस्था कायम

Next

गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र, काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.

गाेरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी

गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेली जनावरे पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावी लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी आहे. गोरक्षण संस्था निर्माण करण्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

भंगार वाहनांमुळे जागेची अडचण

धानाेरा : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यांमध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत.

शहरातील नाल्यांमध्ये फवारणी करा

गडचिरोली : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये नाल्या तुंबल्या असल्याने येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. अशीच स्थिती फुले वॉर्ड, कन्नमवार वॉर्ड, स्नेहनगर व लांझेडा परिसरात आहे.

रुग्णालयासमोरील अतिक्रमण धोकादायक

गडचिरोली : बाल रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला लागून दुकाने थाटण्यात आली आहेत. बालक पळवून नेण्यासारख्या अनुचित घटना टाळण्यासाठी अतिक्रमण हटणे आवश्यक आहे. अतिक्रमणामुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण झाला आहे.

चुरचुरा-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा

गडचिरोली : तालुक्यातील चुरचुरा-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

राजपूर, बोरी भागात बँक शाखा सुरू करा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील राजपूर पॅच व बोरी येथील लोकसंख्या पाच ते सहा हजार आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या वयोवृद्ध नागरिकांची संख्या दीड हजारांच्या आसपास आहे. या वयोवृद्ध नागरिकांना योजनेच्या मानधनाची रक्कम घेण्यासाठी २५ ते ३० किमीचे अंतर गाठून बसथांब्यावर जावे लागते. त्यामुळे राजपूर पॅच व परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोहझरीतील मार्गाचे डांबरीकरण करा

आरमोरी : आरमोरी तालुक्यातील मोहझरी या गावातून आरमोरी-मानापूर मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या पोच मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. या मार्गावर अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. मोहझरी येथील अंतर्गत रस्तेसुद्धा उखडले आहेत.

सौर ऊर्जेवरील अनेक नळ योजनांना घरघर

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावांत विद्युत सुविधा नाही. तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रा.पं.च्या गावांमध्ये सौर ऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रा.पं.च्या दुर्लक्षितपणामुळे अनेक योजनांमध्ये बिघाड आल्याने त्या बंद आहेत. दुरुस्ती करणारी एजन्सी दुर्गम गावात पोहोचण्यास विलंब होत आहे.

बेलगावात भ्रमणध्वनी मनोरा उभारा

रांगी : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या बेलगाव परिसरात भ्रमणध्वनी कव्हरेज राहत नसल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोरा उभारावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. बेलगाव परिसरात बीएसएनएलचे अनेक ग्राहक आहेत.

जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष कायमच

गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक विभागांत रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. एकाच कामासाठी १५-१५ दिवस शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

चपराळा पर्यटन स्थळ विकासाच्या प्रतीक्षेत

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र, याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.

देलनवाडीतील रस्त्यांवर अतिक्रमण कायम

आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी येथील अंतर्गत रस्त्यांवर नागरिक व व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने गावातील रस्ते अरुंद झाले आहेत. मात्र, या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावातील नागरिक सरपण, लाकडे, शेणखताचे ढिगारे, बांधकाम साहित्य तसेच व्यावसायिक विविध वस्तू ठेवत आहेत.

कॉम्प्लेक्स मार्गावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अनेक शासकीय कार्यालयांसाठी इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे या परिसरात भविष्यात नागरिकांची गर्दी वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या बाजूला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर अतिक्रमणाची संख्या वाढली आहे.

प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने

कुरखेडा : कुरखेडा मार्ग तसेच विश्रामगृह परिसरात नेहमीच पार्किंग केलेली वाहने रस्त्याच्या कडेला दिसून येतात, तर दुसऱ्या बाजूला ट्रान्सपोर्ट करणारे मालवाहू ट्रक उभे करून त्यातील माल उतरविण्यापासून सर्व कारभार रस्त्यावरच चालत असतो. येथे वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा शिल्लक राहते. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करून देणे गरजेचे आहे.

भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र, यावर वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. सातत्याने मागणी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्गम गावांमध्ये वीजपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्याचा विकास करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, निधी मिळत नाही.

सोमनूर पर्यटनस्थळ उपेक्षितच

सिरोंचा : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सोमनूर संगमाच्या विकासाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. सोमनूर घाटावर गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असून, हजारो भाविक उपस्थित राहतात. त्रिवेणी संगमावरील दृश्य अतिशय विहंगम असल्याने या ठिकाणी पावसाळा वगळता वर्षभर पर्यटकांची गर्दी राहते. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही.

भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे; परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात.

तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात

गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र, सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.

औद्योगिक वसाहतीचे काम रखडले

धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात पडले आहे.

अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत

अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत आल्या आहेत. तरीही याच इमारतींमधून प्रशासकीय कारभार चालविला जात आहे. मात्र, अद्यापही नवीन इमारत बांधण्यात आलेल्या नाहीत.

पिशव्यांवरील बंदी कागदोपत्रीच

गडचिरोली : शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत; परंतु ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८ ते १२ इंच उंचीपेक्षा लहान आकाराची प्लास्टिक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी.

हनुमान मंदिरात सुविधांचा अभाव

आरमोरी : तालुक्याच्या वडधा परिसरातील गणपूर येथील हनुमान मंदिर देवस्थान विकासापासून वंचित आहे. येथील मंदिराचा विकास साधावा, अशी मागणी परिसरातील भाविकांनी केली आहे. वडधापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गणपूर येथे जंगल परिसरात हनुमान मंदिर वसले आहे. वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथे हातपंप नसल्याने भाविकांना विहिरीचे पाणी काढावे लागते. त्याचबरोबर अन्य सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील भाविकांनी केली आहे.

दुर्गम गावांतील रस्ते खड्डेमय

भामरागड : तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावरील लाहेरी गावाकडे येणारा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे. हिंदेवाडा ते लाहेरी या मार्गाची दुरवस्थाही अनेक दिवसांपासून झाली आहे.

Web Title: The misery of open space remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.