खुल्या जागांची दैनावस्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:08 AM2021-02-06T05:08:16+5:302021-02-06T05:08:16+5:30

गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. ...

The misery of open spaces remains | खुल्या जागांची दैनावस्था कायम

खुल्या जागांची दैनावस्था कायम

googlenewsNext

गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.

गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी

गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कत्तलीसाठी जात असलेली जनावरे पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावी लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी आहे. गोरक्षण संस्था निर्माण करण्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी

धानोरा : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.

भंगार वाहनांमुळे जागेची अडचण

धानाेरा : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यांमध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. या वाहनांनी पाेलीस स्टेशनमधील बरीच जागा व्यापली आहे. त्यामुळे पाेलीस ठाण्यांना जागेची अडचण निर्माण झाली आहे.

सौरऊर्जेवरील अनेक नळ योजना बंद

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावात विद्युतची सुविधा नाही. तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रा.पं.च्या गावांमध्ये सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रा.पं.च्या दुर्लक्षितपणामुळे अनेक योजनांमध्ये बिघाड आल्याने त्या बंद आहेत.

शहरातील नाल्यांमध्ये फवारणी करा

गडचिरोली : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये नाल्या तुंबल्या असल्याने येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. अशीच स्थिती फुले वॉर्ड, कन्नमवार वॉर्ड, स्नेहनगर व लांझेडा परिसरात आहे. शहरातील सर्वच वॉर्डांतील नाल्यांमध्ये फवारणी करावी.

कुरखेडा तालुक्यात पर्यटनस्थळे दुर्लक्षित

कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटनस्थळे आहेत. कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास मनोरंजनाचे साधन उपलब्ध होऊ शकते.

ग्रामीण भागातही पशुधन घटले

एटापल्ली : यंत्रांचा वापर वाढल्याने पशुधनाचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे पशुधन घटत चालले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता केवळ २५ टक्के पशुधन गावात शिल्लक असल्याचे दिसून येते. पूर्वी एक ते दोन एकरचा कास्तकार बैलाची जोडी ठेवत होता. आता मात्र बहुतांश शेतकरी बैलांची जोडी ठेवत नाहीत. ट्रॅक्टर व इतर साधनांच्या मदतीने शेतीची कामे पूर्ण करून घेतात.

झाडांच्या फांद्यांनी झाकोळले पथदिवे

धानाेरा : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्यात.

शेतकरी विविध योजनांपासून अनभिज्ञ

देसाईगंज : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.

शेकडो कृषिपंपांचे वीज कनेक्शन प्रलंबित

सिरोंचा : भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीज कनेक्शन देण्यात आलेले नाही. या तालुक्यातील अनेक शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. एकूण दीड हजारवर कृषिपंपांचे वीज कनेक्शन प्रलंबित आहे.

धानोरा शहरातील अतिक्रमण काढा

धानोरा : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपीक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयामार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे.

शहरातील नाल्यांची दुरुस्ती करा

कुरखेडा : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.

Web Title: The misery of open spaces remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.