गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहिमेसाठी आता ‘मिस्ड कॉल’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:17 PM2017-12-02T12:17:32+5:302017-12-02T12:19:56+5:30

भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण्यात आली आहे.

'Missed Call' Campaign for Gadchiroli Anti-Naxal Campaign | गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहिमेसाठी आता ‘मिस्ड कॉल’ अभियान

गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहिमेसाठी आता ‘मिस्ड कॉल’ अभियान

Next
ठळक मुद्देभूमकाल संघटनेचा पुढाकारदेशातील पहिलाच उपक्रम

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती भूमकाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद सोवनी, सचिव प्रा.श्रीकांत भोवते, सदस्य अविनाश सोवनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सद्य:स्थितीत नक्षलवाद्यांनी ‘एकाला मारा आणि एक लाख लोकांमध्ये दहशत ठेवा’, असा दुर्दैवी उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत मागील आठ-दहा दिवसांपासून नक्षल्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्येचे सत्र सुरू केले आहे. नागरिकांच्या मनामध्ये नक्षलवाद्यांविषयी चिड व तिरस्कार असला तरी भीतीमुळे ते उघडपणे बोलू शकत नाही. त्यामुळे जनता आपल्या पाठिशी आहे, असा तोरा नक्षलवादी मिरवत आहेत. त्यांचा भंडाफोड होण्यासाठी सामान्य नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात उभे होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
नक्षल्यांचा विरोध करण्याची अनेकांची इच्छा असली तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, नक्षलविरोधी अभियानाला त्यांचा पाठिंबा मिळविणे या उद्देशाने मिस्ड कॉल देण्याचे अनोखे अभियान भूमकाल संघटनेकडून राबविले जाणार आहे. नक्षल्यांच्या दहशतीमुळे त्रस्त असलेल्या दुर्गम भागातील व्यक्तीचे शहरात पुनर्वसन करून त्याला खासगी नोकरी मिळवून देणे किंवा आवश्यक ती आर्थिक मदत करण्यासाठीसुद्धा भूमकाल संघटना प्रयत्नरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नक्षलचळवळीतील काही सदस्य त्रस्त आहेत. त्यांना आत्मसमर्पण करायचे असेल तर या क्रमांकावर त्यांनाही मिस्डकॉल करता येईल, अशी माहिती भूमकाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


असे आहे अभियान
८४१२९८८८४४ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला एका मिनीटाच्या आत आपोआप फोन येईल. या फोनवरून नक्षलविरोधी अभियानाची ध्वनीफित ऐकविली जाईल, त्यानंतर भूमकाल संघटनेचे सदस्य, प्रतिनिधी संबंधित व्यक्तीशी स्वत: संपर्क साधून संबंधित व्यक्तीला नक्षल्यांचा विरोध करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतील. त्याचबरोबर नक्षलविरोधी अभियानात सदर व्यक्तीचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

 नक्षलविरोधी जनजागृतीसाठी अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. जी व्यक्ती मिस्ड कॉल देईल, तिचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार आहे.
 किती नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला, याची आकडेवारी जाहीर केली जाईल. त्याचबरोबर येत्या काही दिवसात नक्षलग्रस्त भागातून शोध पदयात्रा काढली जाणार आहे.

Web Title: 'Missed Call' Campaign for Gadchiroli Anti-Naxal Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.