७० टक्के गावांत ‘मिशन भामरागड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:25+5:30
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सलग ७ दिवस पूरपरिस्थितीला तोंड देणाºया भामरागड तालुक्यात आरोग्याविषयीच्या समस्या उद्भवू नये म्हणून दि.११ पासून आरोग्य विभागाकडून ‘मिशन भामरागड’ अभियान सुरु करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अनेक वर्षांच्या पावसाचा रेकॉर्ड मोडणाऱ्या यावर्षीच्या भामरागड तालुक्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीनंतर आरोग्य विभागाने सुरू केलेले ‘मिशन भामरागड’ ७० टक्के गावांत यशस्वीपणे राबविण्यात आले. तालुक्यातील १२८ गावांपैकी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त गावांमध्ये पोहोचण्यात आरोग्य विभागाच्या चमुला यश आले आहे. त्या गावांमध्ये आरोग्य तपासणीसोबतच आवश्यक ते उपचारही या चमूने केले. विपरित परिस्थितीनंतर भामरागड तालुक्यात जलजन्य किंवा कीटकजन्य आजाराचा उद्रेक रोखण्यात आरोग्य विभागाच्या चमुला यश आले आहे, हे विशेष.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सलग ७ दिवस पूरपरिस्थितीला तोंड देणाºया भामरागड तालुक्यात आरोग्याविषयीच्या समस्या उद्भवू नये म्हणून दि.११ पासून आरोग्य विभागाकडून ‘मिशन भामरागड’ अभियान सुरु करण्यात आले होते. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ४७ जणांच्या चमू शक्य तेवढे नदी-नाले पार करत भामरागड तालुक्यातील जवळपास ८० गावांमध्ये पोहोचून रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. १३ सप्टेंबरपर्यंत या तालुक्यातील ग्रामीण भागात फिरून सर्व पिंजून काढण्याचे उद्दीष्ट होते. परंतू प्रत्यक्षात अनेक गावात पोहोचणे अशक्य झाल्याने या चमुपुढे अनेक अडथळे निर्माण झाले. ती अडथळ्यांची शर्यत पार करत आरोग्य विभागाच्या चमूने ७० टक्के गावांमध्ये आरोग्य तपासणी व उपाययोजना केल्या आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांच्यासह जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक, जिल्हा कार्यक्र म व्यवस्थापक डॉ.अनुपम महेशगौरी, तसेच ४ तालुका आरोग्य अधिकारी, ८ वैद्यकीय अधिकारी, २८ आरोग्य सहाय्यक (पुरूष) व आरोग्य सेवक यांचा ‘मिशन भामरागड’च्या चमूत समावेश होता.
भामरागड तालुक्यातील १२८ गावांपैकी ७२ गावांमध्ये प्राथमिक औषधोपचार, रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृतीपर कार्यक्र म घेण्यात आले. यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालयाच्या चमुनेही मोलाचे योगदान दिले आहे. जिल्हास्तरीय चमू परतली असली तरी तालुक्याची चमू दुर्गम गावांमध्ये उपचार देत आहे.
४५८१ घरांपर्यंत पोहोचले आरोग्य कर्मचारी
मिशन भामरागड अंतर्गत आरोग्य विभागाच्या पथकाने तालुक्यातील ४५८१ कुटुंबांपर्यंत जाऊन २४ हजार १२० नागरिकांची तपासणी केली. त्यात सर्दी, खोकला, तापाचे ४६३ रुग्ण आढळले. ८० रुग्ण हगवणीचे आढळले. ४८२ जणांचे रक्तनमुने घेण्यात आले. याशिवाय १०२ रुग्णांचे हिमोग्लोबिन तर ४८ जणांची लघवी तपासण्यात आली. ३३७ जणांचा रक्तदाब तपासण्यात आला. या भेटीदरम्यान अतितीव्र कुपोषित असे २६ बालक तर सर्वसाधारण कुपोषित १२५ बालक आढळले. त्यांनाही आवश्यक तो औषधोपचार देण्यात आला. याशिवाय १४४ गरोदर माता आणि ९४ स्तनदा मातांनाही तपासण्यात आले.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न
या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याची जागृती करण्यासोबतच डासांची उत्पत्ती वाढविणारे १२२३ पाणी साचलेले मोठे भांडे, ड्रम, टायर रिकामे केले. २९६७ ठिकाणी पाण्यात डासांची अळीनाशक टाकले. याशिवाय शेणाचे, कचºयाचे ढिग अशी डासांची उत्पत्तीची ठिकाणे शोधून तिथे डासनाशकाची फवारणी केली. १३९ ठिकाणच्या पाण्याच्या डबक्यांमध्ये गप्पी मासेही सोडण्यात आले.