महाराष्ट्र धर्म दाखवून देण्याची वेळ आलीय; गडचिराेलीच्या मदतीसाठी राेहित पवार यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 10:47 AM2022-07-16T10:47:50+5:302022-07-16T10:54:24+5:30
गडचिरोली जिल्ह्याला मदत करा’ असे आवाहन कर्जत - जामखेडचे आमदार राेहित पवार यांनी ट्वीटद्वारे केले आहे.
गडचिरोली : गेल्या सहा दिवसांपासून गडचिराेली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पूर परिस्थितीमुळे ‘गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचा, भामरागड, अहेरी, एटापल्ली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी साचले असून, घरांना पाण्याचा वेढा पडलाय. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून गडचिरोली जिल्ह्याला मदत करा’ असे आवाहन कर्जत - जामखेडचे आमदार राेहित पवार यांनी ट्वीटद्वारे केले आहे.
गोसेखुर्द, मेडीगड्डा, चिचडोहमधून विसर्ग सुरू असल्याने येणारे काही दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. प्राणहिता, गोदावरी, पर्लकोटा नद्यांनी संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले. गडचिरोली जिल्ह्यात एवढे मोठे संकट असल्याने राज्य सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अशा संकटात मदतीला धावून जाणं, हाच खरा महाराष्ट्र धर्म आहे. गेल्यावर्षी कोकण, प. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करून आपण सर्वांनीच महाराष्ट्र धर्म दाखवून दिला. आता गडचिरोलीसाठीही हाच महाराष्ट्र धर्म दाखवून देण्याची वेळ आलीय, असेही त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचा, भामरागड, अहेरी, एटापल्ली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी साचलं असून, घरांना पाण्याचा वेढा पडलाय. त्यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत असून गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या मदतीची गरज असल्याचं अनेक सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी सांगितलं. pic.twitter.com/dKt7xyV7w2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2022
१२ हजार नागरिकांचे स्थलांतर
सततचा पाऊस आणि जलाशयांमधील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील नागरिकांना सर्वाधिक फटका बसला. शुक्रवारी पूरस्थिती हळूहळू निवळत असल्याचे दिसून आले असले तरी पूरग्रस्त भागातील तब्बल ११ हजार ८३६ नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. अजूनही अनेक घरांना पुराचा वेढा कायम आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्याचा दक्षिण भाग पुराने ग्रासला आहे. त्यातही सिरोंचा, अहेरी, भामरागड या तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
अशा संकटात मदतीला धावून जाणं, हाच खरा महाराष्ट्र धर्म आहे. गेल्यावर्षी कोकण, प. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करुन आपण सर्वांनीच महाराष्ट्र धर्म दाखवून दिला. आता गडचिरोलीसाठीही हाच महाराष्ट्र धर्म दाखवून देण्याची वेळ आलीय.@Gadchirolikarpic.twitter.com/kojpWBeXhM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2022
मेडिगड्डा बॅरेजचे सर्व ८५ गेट उघडल्याने सुरू असलेल्या मोठ्या विसर्गामुळे गोदावरी नदीचे पाणी पात्र सोडून लगतच्या गावात, शेतात शिरले आहे. त्याचा फटका सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना बसला. याशिवाय प्राणहिता नदीचे पाणी सिरोंचा शहरात पसरले. त्यामुळे पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत सिरोंचा तालुक्यातील ३४ गावांमधील, अहेरी तालुक्यातील १३ गावांमधील तर मुलचेरा तालुक्यातील २ गावांमधील नागरिकांना हलविण्यात आले.