आमदार रोहित पवार गडचिरोली दौऱ्यावर; पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 05:00 PM2022-07-21T17:00:30+5:302022-07-21T17:14:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार बुधवारी अहेरीत दाखल झाले.
अहेरी (गडचिरोली) : गेल्या दोन आठवड्यांपासून अहेरी विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार बुधवारी अहेरीत दाखल झाले. सोबत त्यांनी जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले दोन ट्रकही आणले आहेत.
बारामती ॲग्रो कंपनी आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पूरग्रस्त अहेरी, सिरोंचा भागात केले जाणार आहे. आ. पवार यांनी बुधवारी आ. धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेतली. त्यानंतर पूरपीडितांच्या भेटीकरिता ते धर्मरावबाबा यांच्यासोबत अहेरी येथून सिरोंचाकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आणि अन्य पदाधिकारीही होते.
अहेरी येथे सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या अहेरीतील हेल्पिंग हॅंड्स बहुद्देशीय सेवाभावी संस्था, एकता बहुद्देशीय क्रीडा व कला मंडळ अहेरी आणि शिवकल्याण युथ मल्टिपर्पज डेव्हलपमेंट फाउंडेशन गडचिरोली यांच्याकडे पूरपीडित व गरजूंच्या मदतीकरिता आर्थिक मदतही त्यांनी सुपूर्द केली.
तीन दिवस करणार पूरग्रस्त भागात दौरा
आपली माणसं अडचणीत असताना शक्य ती मदत करण्याची महाराष्ट्र राज्याची परंपरा आहे, त्याअनुषंगाने राज्याच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात अन्नधान्य, औषधे, कपडे, आदी जीवनावश्यक वस्तू व साहित्य पोहोचविण्यासाठी आणि पूरग्रस्त भागातील नागरिक व पूरपीडितांच्या भेटीसाठी आपण आल्याचे आ. रोहित पवार म्हणाले, या दौऱ्यात ते तीन दिवस मुक्कामी राहून पूरक्षेत्रातील भागाचा दौरा करून त्यांना दिलासा देणार आहेत.