आमदारांनी घेतला काेविड सेंटरच्या स्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:33 AM2021-04-26T04:33:17+5:302021-04-26T04:33:17+5:30
आरमोरी : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आमदार कृष्णा गजबे यांनी शुक्रवारी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्याकडून काेराेना ...
आरमोरी : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आमदार कृष्णा गजबे यांनी शुक्रवारी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्याकडून काेराेना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी काेविड केअर सेंटरलाही भेट दिली.
तहसीलदार कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत कोविड केअर सेंटरविषयी तहसीलदारांनी माहिती दिली. सध्या मुलांच्या वसतिगृहात ९० रुग्ण, आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३० असे एकूण १२० रुग्ण उपचार घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे जवळपास १६ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच गृह अलगीकरणात जवळपास ६० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला आमदार कृष्णा गजबे यांनी भेट दिली. दिवसेंदिवस बधितांची वाढती संख्या लक्षात घेता, आरमोरी येथे कोविड केअर सेंटरसाठी दाेन इमारती अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये समाजकल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह व प्रीती आदिवासी आश्रमशाळा यांचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार डहाट यांनी दिली.
आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र घरगुती व कृषिपंपांची वीज खंडित होते. याबाबत अभियंता बोबडे आणि मेश्राम यांना विचारणा करून विजेचा लपंडाव तत्काळ बंद करावा. कोरोनाच्या संकट काळात सुरळीतपणे वीजपुरवठा करावा. यामुळे कोणत्याही रुग्णाला त्रास व धोका होणार नाही, शेतकऱ्यांना शेतीलाही वेळाेवेळी पाणीपुरवठा करता येईल, असेही आमदार गजबे म्हणाले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.