कव्हरेजअभावी माेबाईलधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:32+5:302021-09-27T04:40:32+5:30
आलापल्ली : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, ...
आलापल्ली : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली, आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. टाॅवर व भूमिगत केबल लाईनवर लाखाे रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नाही.
अतिक्रमणाच्या विळख्यात आरमाेरी शहर
आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच खुल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम बांधले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
झिंगानूर परिसरातील बंधारा दुरुस्ती नाही
झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने याेग्य नियाेजन करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली नाही.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : वीज वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून, येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. प्रत्येकाला शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे केल्यास कर्मचारी वेळेवर कार्यालयात पाेहाेचतील. नागरिकांची कामे वेळेवर हाेतील. तसेच पेट्राेलची बचत झाल्यास राष्ट्रीय संपत्तीची बचत हाेण्यास मदत हाेईल.
नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.