वीज जाताच मोबाईल कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:38+5:30
देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे बीएसएनएलचेच सीम आहेत. सुरूवातीला ग्राहक कमी होते. त्यावेळी सेवा चांगली मिळत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मोबाईल टॉवर सुरू ठेवण्यासाठी बॅटऱ्यांचा उपयोग केला जातो. मात्र कोरची येथील बहुतांश मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होताच मोबाईल टॉवर काम करणे बंद करते. परिणामी कोरची शहरातील क व्हरेज ठप्प होऊन हजारो मोबाईलधारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांकडे बीएसएनएलचेच सीम आहेत. सुरूवातीला ग्राहक कमी होते. त्यावेळी सेवा चांगली मिळत होती. आता ग्राहक वाढल्याने मोबाईल टॉवरची क्षमता सुद्धा वाढविणे आवश्यक होते. मात्र बीसएनएलने याकडे दुर्लक्ष केल्याने वाढत्या ग्राहकांना इंटरनेट स्पिड मिळत नाही. अनेकवेळा मोबाईल व्यस्त असल्याचे दाखविते. त्यामुळे मोबाईलधारक कमालीचे त्रस्त आहेत.
मोबाईल व इंटरनेट सेवा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईल टॉवरसोबत बॅटरी, जनरेटर राहते. मात्र येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या व्यवस्थित काम करीत नाहीत. तसेच जनरेटरही सुरू केले जात नाही. परिणामी वीज गुल होताच मोबाईल टॉवर काम करणे बंद होते.
कोरची तालुका शासन व प्रशासनदरबारी नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. छत्तीसगड राज्याला कोरची तालुक्याची सीमा लागून असल्याने येथील नागरिकांचा छत्तीसगड राज्याशी संपर्क येते. छत्तीसगड राज्यातील गावांमध्ये झालेली प्रगती लक्ष वेधून घेते. तालुक्यात सिंचन सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अतिशय कनिष्ठ दर्जाचे आहे.
छत्तीसगड राज्यातील क व्हरेजचा सहारा
छत्तीसगड राज्यातील काही सीमावर्ती गावांमध्ये जीओ कंपनीने मोबाईल टॉवर उभारले आहेत. त्या टॉवरची रेंज कोरची येथील काही निवडक भागांमध्ये उपलब्ध होते. बीएसएनएलची सेवा ठप्प पडते. त्यावेळी नागरिक स्लॅबवर चढून जीओचे कव्हरेज शोधत राहतात. मात्र जीओचे टॉवर कोरचीपासून दूर असल्याने पाहिजे तेवढी स्पिड उपलब्ध होत नाही. कोरची येथे टॉवर उभारावे, यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली. जीओ कंपनी टॉवर उभारण्यास तयार आहे, मात्र प्रशासकीय अडचणी आल्यामुळे त्यांचा टॉवर उभा झालेला नाही.
वारंवार नेटवर्क जाण्याबाबत बीएसएनएलच्या कोरची येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, कोरची येथील वीज २४ तासांपासून खंडित आहे. बॅटऱ्या केवळ चार तास चालू शकतात. त्यामुळेच मोबाईल टॉवर बंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर थ्री-जी सेवा बंद केली जाते. केवळ टू-जी सेवा सुरू राहते, अशी माहिती दिली. सरकारी कंपनी असूनही प्रशासकीय यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.